अन्य

माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं अल्पशा आजाराने दु:खद निधन

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक

                  सतत नऊ वेळा लोकसभेत जाण्याचा विक्रम काळाच्या पडद्या आड, माजी आ. निर्मलाताई गावित यांचे पितृ छत्र हरपले.

                माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने प्राणज्योत मालवली. ते 88 वर्षांचे होते. माणिकराव गावित नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहिले होते. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे.

               गावित यांच्या पार्थिवावर नवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर नाशिकधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती डॉक्टरांनी दिली.

                 माणिकराव गावित सलग ९ वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांनी १९६५ साली ग्रामपंचायतीच्या राजकारणाला सुरुवात केली होती. १९८१ साली पहिल्यांदा गावित खासदार झाले होते. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आदी पदांची जबाबदारी संभाळली आहे. ते लोकसभेचे हंगामी अध्यक्षही होते. माणिकराव गावित यांची मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार, तर मुलगा भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.

माणिकराव गावित यांची राजकीय वाटचाल

•नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे २९ ऑक्टोबर १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला.
•त्यांचे शिक्षण जुन्या काळातील मॅट्रिकपर्यंत झाले.
•१९६५ साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले
•धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातून ते सदस्य म्हणून निवडून आलेत.
•१९७१ ते १९७८ साली धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून निवडून आले
•१९८० साली नवापूरचे आमदार झाले
•माणिकराव गावित हे १९८१ साली प्रथमच खासदार झाले, त्यावेळी त्यांचे ४७ वय होते
•तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल ९ वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत.
•१९९९ साली झालेल्या तेराव्या लोकसभेत त्यांना १.३०७७१ इतके प्रचंड मताधिक्य लाभले. देशातील प्रचंड मताधिक्य मिळवणाऱ्या टॉपटेन खासदारांमधील एक म्हणून संबंध देशाला ते परिचित झाले.
•१९८१ ते २००९ हा माणिकराव गावित यांच्या खासदारकीचा रौप्य महोत्सवी काळ आहे. या काळात त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणून काम केले.
•१९८१-८२ मध्ये ते समाज कल्याण समितीचे अध्यक्ष होते. १९८१ ते १९८४ या काळात ते महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष होते.
•१९९० ते १९९६, १९९८-९९ तसेच २००० या काळात पेट्रोलियम आणि केमिकल व नैसर्गिक वायू या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. १९९१ ते ९३ आणि १९९९ ते २००० या काळात त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी संबंधित सल्लागार समितीवर सदस्य म्हणून कार्य केले आहे.
•१९९८-९९ या काळात लेबर ॲण्ड वेल्फेअर मंत्रालयाच्या समितीचे सदस्य म्हणूनही कार्य केले आहे.१९९९ ते २००१ या काळात अनु. जाती व अनु.जमाती कल्याण समितीचेही सदस्य होते. १९९०-९१ आणि १९९९-२००० या काळात लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या अनुपस्थिती संदर्भातील समितीचे ही ते सदस्य होते.
•सोनिया गांधी यांनी त्यांना २२ मे २००४ रोजी डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून स्थान मिळवून दिले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत