अन्य

पालकमंत्री दादा भुसेंनी ऐकली वारकऱ्यांची हाक ; पालखी सोहळ्याला ३० लाखांचा निधी मंजूर

Spread the love

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

                  त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी उद्या (दि.२ जून) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात ४२ दिंड्यांसमवेत हजारो वारकरी सहभागी होणार आहेत. पालखी सोहळ्यातील वारकरी सुमारे २५ दिवस पायी प्रवास करून आषाढी एकादशीसाठी पंढरपूरात पोहोचणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी वारकऱ्यांची हाक ऐकली असून महत्वाचा निर्णय घेतला आहे.

                   संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ३० लाखांचा निधी मंजूर करून दिलेला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पाण्याच्या टँकर्ससह मोबाईल टॉयलेट्स उपलब्ध होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी प्रत्येकी १० सीटचे १२ मोबाईल टॉयलेट्स पंढरपूरपर्यंत पुरवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.

इतिहासात पहिल्यांदाच ‘हा’ निर्णय….

                संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून २ जून रोजी दुपारी २ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. तसेच संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या जयंतीचे हे सातशे पन्नासावे वर्ष असल्याची माहिती संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी एक दिवस अगोदर होणार आहे.

             तसेच प्रथमच त्र्यंबकेश्वर येथेच प्रयागतीर्थाजवळील महानिर्वाणी आखाड्यात सद्गुरू श्रीगहिनीनाथ महाराजांच्या समाधी स्थानी गुरुघरी निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला मुक्काम करणार आहे. पालखी एक दिवस अगोदर मार्गस्थ करण्याचा निर्णय निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या इतिहासातील पहिलाच निर्णय आहे.

४२ दिंड्यांसमवेत हजारो वारकरी…

                   या पालखी सोहळ्यात ४२ दिंड्यांसमवेत हजारो वारकरी सहभागी होणार आहेत. पालखी सोहळ्यातील वारकरी सुमारे २५ दिवस पायी प्रवास करून वारकरी २८ जून रोजी पंढरपूरात पोहचणार आहेत. या पालखी सोहळ्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेकडून दरवर्षी आरोग्य पथक व पाण्याचा टँकर पुरवला जातो. त्यासाठी जिल्हा परिषद २ सेस निधीतून चार लाख रुपयांची तरतूद केली जाते. 

यंदा प्रथमच ३० लाख रुपयांचा निधी मंजूर

                    मात्र, एवढया मोठ्या दिंडी सोहळ्यात ही सुविधा अपुरी पडत आहे. यामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निर्मलवारीसाठी फिरते टॉयलेट व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुविधा पुरवण्याची मागणी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत पालखी सोहळ्यासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पाच टँकर्स पंढरपूरपर्यंत पुरवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

                       याशिवाय १२ फिरते टॉयलेट्स देखील पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा आता निर्मलवारी होणार आहे. यासाठी यंदा प्रथमच ३० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून दिला.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत