कणकोरी व दोडी येथील दोन्ही कन्यांच्या तरुप्रीत प्रकल्पास आला बहर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर. प्रतिनिधी सुरेश सांगळे सिन्नर सिन्नर: ता. ०४/०२/२०२५ सिन्नर येथील तरुप्रीत प्रकल्पांतर्गत सुमारे १५००० हून अधिक बीजारोपण व ५०० हून अधिक वृक्षारोपण करून ओसाड माळरानावर हिरवळ फुलविणाऱ्या दोन मैत्रिणी प्रा. मंगल कचरू सांगळे व प्रियांका बाळासाहेब केदार यांना रंगकर्मी प्रतिष्ठान, उदगीर, जिल्हा- लातूर येथील पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल दिला जाणारा २०२५ चा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार तरुप्रीत प्रकल्पास जाहीर झाल्याची माहिती रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड यांनी निवड पत्राद्वारे दिली आहे. या पुरस्काराचे वितरण ८ फेब्रुवारी २०२५ रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शिवाजी महाविद्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. प्रा. मंगल सांगळे व प्रियांका केदार यांनी सुरू केलेली ही हरित चळवळ आणखी जोमाने जाण्यासाठी सदर पुरस्कार प्रेरणादायी ठरणार आहे. प्रियांका बाळासाहेब केदार या औषध निर्माणशास्त्र शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तर प्राध्यापिका मंगल कचरू सांगळे या के. व्ही. एन. नाईक महाविद्यालय सिन्नर येथे मराठी विषयाचे अध्यापन करीत असून राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी पदावर देखील कार्यरत आहेत. तसेच त्या कवयित्री व लेखिका म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नरच्या कोषाध्यक्ष पदावर त्या कार्यरत आहेत. त्यांना आजवर भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड २०२० या राष्ट्रीय पुरस्कारासोबतच अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. तरुप्रीत प्रकल्पासाठी मिळालेल्या या पुरस्कारासाठी सर्व स्तरातून प्रा. मंगल सांगळे व प्रियांका केदार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.