दिनेश गोसावी/ संपादक-दक्ष पोलिस वार्ता,नाशिक
महाराष्ट्र शासनाच्या राज्य बियाणे उपसमितीची ५२ वी विशेष बैठक आज मुंबई येथे मंत्रालयात कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये विविध राहुरी दापोली, परभणी, अकोला, सोलापूर येथील कृषी विद्यापीठांच्या नवीन १४ अन्नधान्य व फळपीक वाणांच्या प्रस्तावांना मान्यता देऊन केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडे शिफारस केल्याची माहिती राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी दिली. यावेळी बैठकीस राज्य कृषी आयुक्त धीरजकुमार, शेतकरी प्रतिनिधी खंडू बोडके पाटील, चंद्रकांत शेवाळे यांच्यासह सर्व विद्यापिठांचे कुलगुरू व प्रतिनिधी उपस्थीत होते.
बैठकीत दहा अन्नधान्ये व चार फळपिकांच्या नवीन वाणांबाबत सविस्तर चर्चा करून त्याबाबत केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात रब्बी ज्वारी (ट्रॉम्बे अकोला सुरुची), भात (पीडीकेव्ही साधना), ज्वारी (फुले यशोमती), ऊस (फुले ११०८२), उडीद (फुले वसू), तीळ (फुले पूर्णा), ज्वारी (परभणी वसंत), सोयाबीन (एमएयुएस – ७२५), करडई (परभणी सुवर्णा-१५४), फळपिके पेरू (फुले अमृत), चिंच (फुले श्रावणी), डाळिंब (सोलापूर लाल), नारळ (कोकोनट हायब्रीड) या १४ वाणांच्या शिफारसीला मान्यता देण्यात आली आहे.
यावेळी बैठकीत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन व इतर बियानांबाबत झालेल्या फसवणुकीच्या तक्रारींचा पाढाच खंडू बोडके पाटील यांनी प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासमोर वाचला. तसेच सांगली येथील शिवतेज फार्मर प्रोड्यूसर कंपनीने निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे बोगस बियाणे विक्री केल्याने कारवाई करण्याची मागणी केली. तसेच नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी मेट्रिक टनाप्रमाणे वाढीव अनुदान देण्याची मागणीही यावेळी मालेगावचे चंद्रकांत शेवाळे, निफाडचे खंडू बोडके पाटील यांनी बैठकीत केली. सोयाबीन, करडई यासह इतर तेलपिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरयांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे, अशी सूचनाही यावेळी करन्यात आली. खंडू बोडके पाटील व चंद्रकांत शेवाळे यांनी सचिव एकनाथ डवले यांना यावेळी तक्रार निवेदन दिले. याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी यावेळी दिले.
चौकट
नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश बियाणे उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी बियांनाबाबत फसवणूक झाल्यास आपल्या ७५८८०३६४३६ या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल.!
— श्री.खंडू बोडके पाटील (सदस्य – राज्य बियाणे उपसमिती, मंत्रालय)
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 9822817037 / 9822117037