सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक
कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या, परंतु अद्यापही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या नवीन मेळा बसस्थानकातील ९३ हजार रुपयांचे सोलर चोरट्यांनी लंपास केले आहे. नवीन मेळा बसस्थानक अद्याप सुरूही झालेले नाही. त्यापूर्वीच येथील आधुनिक सुविधांची चोरी होऊ लागल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगार एकचे व्यवस्थापक प्रतापसिंग दिलीपसिंग राजपूत (रा. काठे गल्ली, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन मेळा बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधा आणि वातानुकूलित यंत्रणेसह उभारण्यात आलेले राज्यातील भव्य बसस्थानक आहे. परंतु सदर बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र हे बसस्थानक सुरू होण्यापूर्वीच येथील सोयीसुविधांची दुर्दशा होऊ लागली आहे.
राजपूत यांच्या फिर्यादीनुसार, बसस्थानकातील सोलरच्या वायर, तांब्याचे रॉड आणि तांब्याच्या पट्ट्या असा सुमारे ९३ हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. सदर प्रकार २ ते २५ जूनदरम्यान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे चोरट्यांनी या बसस्थानक भोवतीचे पत्रेही उचकटून टाकले आहेत. तसेच अनेकजण आतमध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश करतात. रात्री नशेखोर नशा करतात. त्यामुळे येथे उभारलेल्या अत्याधुनिक साहित्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक साबळे करीत आहेत. नवीन मेळा बसस्थानक भोवती पत्र्यांचे संरक्षण उभारलेले होते. परंतु गेल्या दीड वर्षांपासून येथील कामकाज पूर्णत्वास आलेले असल्याने तेथे कोणी नसते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037