अनिस शेख / उपसंपादक, दक्ष पोलीस वार्ता नाशिक
नाशिक महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आज दि. 20-01-2023 रोजी मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील हॉटेल व्यावसायिकांची बैठक झाली. स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 अंतर्गंत नाशिक शहराचा क्रमांक उंचावण्यासाठी या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मा. आयुक्त यांनी इंदूर शहराचे उदाहरण सांगून तेथील बदललेली जीवनपद्धती सांगितली. नाशिक शहर सुंदर करण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने ‘माझे शहर स्वच्छ आहे. ते मी घाण होऊ देणार नाही’ यासाठी दक्ष राहिले पाहिजे. शहर स्वच्छ राहण्यासाठी कच-याचे वर्गीकरण महत्वाचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ‘मानवतेची भिंत’ उभारुन तेथे वापरण्यायोग्य कपडे, वस्तु ठेवण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले. बैठकीला शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, अधिक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, हॉटेल आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण आणि शहरातील हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.
डॉ. आवेश पलोड यांनी ओला कचरा, सुका कचरा वेगळा हवा असल्याचे सांगून वेस्टेज फुड वेगळ्या कंटेनरमध्ये द्वावे, असे आवाहन हॉटेल व्यावसायिकांना केले. 50 ते 100 किलो पेक्षा जास्त ओला कचरा असल्यास त्याची विल्हेवाट संबंधित आस्थापने लावू शकतात त्यासाठी कंपोस्टिंग, बायोगॅस असे पर्याय असल्याचे सांगितले. माहिती, शिक्षण आणि संवाद या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच केटरर्स आणि मॅरेज हॉल व्यावसायिकांचीही बैठक घेणार असल्याचे सांगितले. प्लॅस्टिक बंदीबाबतही डॉ. पलोड यांनी माहिती दिली. सन 2022 या वर्षात शहरात 409 केसेसमधून 21 लाख 55 हजारांचा दंड आकारल्याचे सांगितले. उदय धर्माधिकारी यांनी वेस्ट टू एनर्जी प्लॅन्टबाबत माहिती देऊन शहरातून 15 मेट्रीक टन फुड वेस्टेज अपेक्षित असल्याचे सांगितले. मात्र केवळ दीड टन फुड वेस्टेज संकलित होते. त्यातून केवळ 200 ते 250 किलो वॅट वीज निर्मिती होते. 3300 किलो वॅट वीज निर्मिती अपेक्षित असल्याचे सांगितले.
शहराच्या सौंदर्यीकरणासाठी मनपा करीत असलेल्या प्रयत्नांबाबत शिवकुमार वंजारी यांनी माहिती दिली. बांधकाम विभागाने वाहतूक बेटे, दुभाजक विकसीत केले आहेत. हॉटेल व्यावसायिक त्यांचे 10 वर्षांसाठी प्रायोजकत्व घेऊन मेंटेनन्सची जबाबदारी घेऊ शकतात. बांधकाम विभागाने शहरात अशी 64 ठिकाणे प्रायोजक तत्वावर विकसीत करण्यासाठी निश्चित केली आहेत, अशी माहिती दिली. हॉटेल आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनीही यावेळी काही सुचना केल्या. प्रायोजक असलेले दिशा दर्शक बोर्ड टॅक्स फ्री करण्याची सुचना केली. उड्डाण पुलाचे खांब तसेच शासकीय इमारतींच्या भिंती रंगवून त्यावर स्वच्छता विषयक घोषवाक्य, चित्र रंगवून जनजागृती करण्याचे सुचविण्यात आले. बैठकीला जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, प्रशांत ठोके, मोहित जगताप, विशाल तांबोळी आणि मनपाचे सहा विभागीय स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. हॉटेल आणि बार असोसिएशनचे पदाधिकारी श्रीधर शेट्टी, ताज हॉटेलचे हनुमंत शिंदे, नासिक्लबचे किशोर पुंड, याहू हॉटेलचे मोहन पाटील आणि इतर हॉटेलचे असे 30 प्रतिनिधी उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037