अन्य

सहा महिन्यात रस्ते उध्वस्त, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे आमरण उपोषण तसेच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा

Spread the love

राजेंद्र कोल्हे/प्रतिनिधी,दक्ष पोलीस वार्ता,चांदवड

                     चांदवड शहरातील प्रभाग क्र. ९ ते १३ मधील रस्त्याच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, चांदवड – देवळा तालुक्याचे आमदार, जिल्हाधिकारी, उप – विभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना १०६ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असणारे निवेदन देण्यात आले. 

                    चांदवड शहरातील प्रभाग क्र. ९ ते १३ मध्ये ५ – ६ महिन्यांपूर्वी रस्त्याच्या काँन्क्रिटीकरणाचे काम करण्यात आले होते. परंतु, या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व ओबडधोबड करण्यात आलेले असुन या रस्त्यात जागोजागी मोठ – मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यामधून दगडं, खडी वर आलेले आहेत. या रस्त्यावरुन चालतांना दुचाकी वाहने घसरुन दुचाकी वाहन चालक खाली पडतात व जखमी होतात. पायी चालणाऱ्या लोकांनाही या रस्त्यावरुन चालतांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा येथे नागरिकांना ठेच लागते. वाहन चालकांना व पायी चालणाऱ्या लोकांना या रस्त्यावरुन चालतांना खूप कसरत करावी लागत आहे. येथील नागरिकांनी रस्त्याचे काम सुरु होण्यापुर्वी रस्त्याच्या दुतर्फा गटार काढावेत, म्हणून प्रशासनाला विनंती केली होती. परंतु, येथे गटार बांधण्यात आले नाहीत. या रस्त्याच्या अशा नित्कृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिक व महिलांमध्ये संतप्तेचे वातावरण निर्माण झालेले आहे. 

               येथील नागरिकांनी या रस्त्याचे काम करणाऱ्या इंजिनिअर व ठेकेदारांना या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत विचारणा केल्यावर या इंजिनिअर व ठेकेदारांनी या लोकांवर दडपशाही केली व त्यांच्या मनमानी कारभाराने त्यांनी या रस्त्याचे काम केले. या रस्ताचे बांधकाम करुन फक्त ५ ते ६ महिनेच झाले असताना सुद्धा या रस्त्याची अशी दयनीय अवस्था झालेली आहे. यावरुनच असे कळते की, या रस्त्याचे काम फक्त आणि फक्त विकासकामांचा निधी हडपण्यासाठीच या रस्त्याचे ठेकेदार, इंजिनिअर व नगरपरिषद अधिकारी यांच्याकडून करण्यात आलेले आहे. ‘ या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून किती निधी मंजूर करण्यात आला ? ‘, हे चांदवड शहरातील जनतेला तपशीलवार कळविण्यात यावे. या रस्त्याच्या कामात चांगल्या क्वालिटीचे सिमेंट, स्टील व वाळू देखील वापरण्यात आले नाहीत. या रस्त्याचे संपूर्ण काम कच मध्येच करण्यात आलेले आहे.

                   विकासकामाचे जेव्हा टेंडर निघते तेव्हा ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट देताना ठेकेदाराकडून ‘ किती वर्ष हे काम टिकेल, दहा वर्षे की वीस वर्ष टिकेल ? ‘, असे हमीपत्रात लिहून जाते. पण हा रस्ता फक्त ५ ते ६ महिन्यांतच उद्ध्वस्त झाला यावरुन असे लक्षात येते की, येथे ठेकेदाराकडुन हमीपत्रही लिहून घेण्यात आलेले नाही. रस्त्याचे ठेकेदार, इंजिनिअर व नगरपरिषद अधिकारी यांनी संगनमताने या रस्त्याच्या कामाचा निधी लाटला आहे. जिथे – जिथे अशा ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे कामे केलेले असतील त्या ठेकेदारांचे लायसन्स जप्त करून प्रशासनाने त्या ठेकेदारांचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावर कडक कारवाई करावी.

                प्रभाग क्र. ९ ते १३ मध्ये लवकरात – लवकर नवीन व चांगल्या दर्जाचा रस्ता व रस्त्याच्या बाजूने गटार बांधण्यात यावे, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल व यानंतर कायदा सुव्यस्थेचे प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी वसीम शेख, साजन वानखेडे, ओंकार जाधव, आसद शेख, नईम खान, तौसीफ शेख, सोफियान सय्यद, रमीज कुरेशी, रैय्यन शेख, फरीद पठाण, झाकीर बेग सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

साजिद शेख 

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत