सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज नाशिक
नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती की त्यात १४ पेक्षा अधिक प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला. पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. त्यात बसचालकाचाही मृत्यू झाला.
यवतमाळ येथून ही बस काल रात्री नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने रवाना झाली. त्यातून ३० पेक्षा अधिक प्रवाशी प्रवास करीत होते. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात आयशर ट्रक आणि खाजगी बस यांच्यात भीषण अपघात झाला. यात ट्रकची डिझेल टाकी फुटून सर्वत्र डिझेल पसरले आणि दुसरीकडे बस अन्य एका चारचाकी वाहनाला धडकली. त्यानंतर लगेचच बसमध्ये स्फोट होऊन आग लागली. अनेक प्रवाशी झोपेत असल्याने काही समजण्याच्या आतच त्यांचा भाजून मृत्यू झाला.
बसमधील जे प्रवाशी जागे होते त्यांनी तातडीने बसबाहेर धाव घेत मदतीसाठी आकांत सुरू केला. घटनास्थळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर अग्निशमन दलाचे केंद्र असतानाही प्रत्यक्षात मदत पोहोचण्यासाठी तब्बल एक तास लागला. आधी पोलीस, त्यानंतर अग्नीशमन आणि नंतर ॲम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत स्थानिक नागरिक आणि या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी मदतकार्य सुरू केले होते. मात्र, आग एवढी भीषण होती की, मदतीसाठी याचना करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037