अन्य

पालकमंत्र्यांकडून मनपा मुख्यालयात आढावा बैठक, आरोग्य, शिक्षण घटकांवर भर देण्याची सूचना

Spread the love

जाहिद शेख / उपसंपादक, दक्ष पोलीस वार्ता, नाशिक

                 नाशिक महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी मा. दादाजी भुसे, बंदरे व खणीकर्म मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आढावा बैठक घेतली. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंत्री महोदयांचे स्वागत केलं. प्रभारी अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचे स्वागत केले.

             यावेळी बांधकाम विभाग, नगर रचना विभाग, पाणीपुरवठा विभाग, अतिक्रमण विभाग, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, प्रशासन, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी आपल्या योजनांबाबत सादरीकरण केलं. आरोग्य, शिक्षण या घटकांकडे सर्वांनीच लक्ष दिलं पाहिजे अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छतागृहे असावीत, शैक्षणिक वातावरण उत्तम असावे तसेच अंगणवाड्यांची स्थिती चांगली असावी अशी सूचना केली. त्रंबकेश्वर परिसरातून नाशिक मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिटीलिंकने जादा बसेस सोडाव्यात अशी सूचनाही केली. पाटबंधारे विभाग आणि नाशिक महानगरपालिका यांच्यातील पाण्याबाबतच्या कराराबाबत मुख्यमंत्र्यांकडे लवकरच आपण बैठक घेऊ असे आश्वासन दिले. महानगरपालिकेच्या खत प्रकल्पातील घंटा गाडी कर्मचाऱ्यांना नियमित आणि पूर्ण वेतन त्यांच्या खात्यावर कसं जमा होईल हे पाहावे असे सांगितले. 159 झोपडपट्टीबाबत क्लस्टर एसआरए योजनेचा आराखडा ठाणे, मुंबईच्या धर्तीवर करावा अशी सूचना केली. तसेच खड्डे बुजवाच पण डांबरीकरणापेक्षा दीर्घकाळ टिकतील असे काँक्रीटचे रस्ते बनवण्यावर भर दिला पाहिजे असे मार्गदर्शन बैठकीत केले. शासन किंवा मनपा जागेवर अतिक्रमण केलेल्यांना जागा नियमित करून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देता येईल का? याबाबत सर्व बाजू तपासून घायची सूचना त्यांनी अतिक्रमण विभागाला केली. डेंग्यू, फ्लू बाबत आरोग्य विभागाने दक्ष राहण्याची सूचना केली. शहरातील सिडको आणि पंचवटी भागात 200 बेडचे रुग्णालय उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. खासदार गोडसे यांनीही लोकसंख्येच्या तुलनेत मनपा हॉस्पिटल आणि बेडची संख्या वाढवण्याची सूचना केली.

              मनपातील रिक्त पद भरती बाबतही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. दिवाळीत मनपा कर्मचाऱ्यांना चांगला बोनस द्यावा, अशी सूचना पालकमंत्री यांनी बैठकीत शेवटी केली. त्यावर कर्मचाऱ्यांना कुठेही नाराज करणार नाही असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत