अन्य

शिक्षक दिनानिमित्त आयुक्तांकडून मनपा शाळेत शिक्षकांचा सत्कार, विद्यार्थ्यांशीही साधला संवाद

Spread the love

इम्रान अत्तार / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता, नाशिक

           नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन अचानकपणे सावित्रीबाई फुले शाळा मनपा क्र.७८ (मुली) (ISO मानांकित)आणि मनपा हायस्कूल अंबड शाळेला भेट दिली. आयुक्तांनी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षक दिनी आयुक्तांच्या हस्ते असा सन्मान प्रथमच झाल्याचे शिक्षकांनी सांगितले. यावेळी आयुक्तांनी दोन्ही शाळांमधील वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनिता धनगर यावेळी उपस्थित होत्या. शाळेत शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी चालु असतानाच मा. आयुक्तांचे आगमन झाले. विद्यार्थिनींनी त्यांचे औक्षण केले. प्राथमिकच्या मुख्याध्यापिका वैशाली ठोके यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आयुक्तांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. े

आयुक्तांचा वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद

                 आयुक्तांनी प्राथमिक शाळेत पहिली आणि दुसरीच्या वर्गांना भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. विविध प्रश्न विचारून विद्यार्थीनींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. दैनंदिन अभ्यासाच्या वह्या बघितल्या. पाढे पाठांतर बघितले. अभ्यासाची चौकशी करून त्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. प्रत्येक वर्गात विद्यार्थिनी शिक्षकाच्या भूमिकेत वावरताना दिसल्या. माध्यमिक विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक अरुण दातीर यांनी आयुक्तांचे स्वागत केले. आठवीच्या वर्गात गेल्यावर आयुक्त बेंचवर बसले होते. शिक्षिका झालेल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारुन त्यांच्याशी संवाद साधला. प्रत्येक वर्गातील विदयार्थी संख्या बघून समाधान व्यक्त केले. शाळेबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी मनपा अंगणवाडीलाही आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली. मुलांशी संवाद साधला. अंगणवाडी सेविका शोभा देशमुख यांनी माहिती दिली.

                माध्यमिकचे प्रभारी मुख्याध्यापक अरुण दातीर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका वैशाली ठोके, संजय मोरे, राजेश दाभाडे, विक्रम नागरे, सतिश बच्छाव, अशोक देवरे, हिरामण चव्हाण, नितीन वाजे, रविंद्र देवरे, सुरेखा महाजन, सुनिता दशपुते, दिपाली चंद्रात्रे, रंजना मांडे, हेमलता राखोंडे, भारती बच्छाव यांचा आयुक्तांनी गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. यावेळी अंबड गावातील स्थानिकांनीही आयुक्तांचं स्वागत करुन त्यांच्याशी संवाद साधला. जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम उपस्थित होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत