बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे २०२४ तंत्र प्रदर्शन
जव्हार: ‘कौशल्य अंगी कौतुके जगी’ या उक्तीप्रमाणे कौशल्याचे जगामध्ये कौतुक होतेच या अंगीच्या कौशल्याला वाव व चालना देण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दरवर्षी तंत्र प्रदर्शन भरवले जाते.
भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार चे तंत्र प्रदर्शन २०२४ चे उद्घाटन सोमवार २३ डिसेंबर रोजी करिष्मा नायर (भा.प्र.से.) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जव्हार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
नायर यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रतिकृतीला भेट देऊन माहिती घेतली प्रशिक्षणार्थ्यांना त्याविषयी विविध प्रश्न विचारून त्यांनी केलेल्या कौशल्याचे कौतुक केले आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करतांना प्रशिक्षणार्थ्यांना तुमचे हे कौशल्य जगात तुमची ओळख बनेल असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यामध्ये विशेष करून प्रथम वर्ष वीजतंत्रीचा रोहित भोये या अतिदुर्गम भागातून येणाऱ्या दिव्यांग प्रशिक्षणार्थ्याने आपल्या कल्पक बुद्धीतून बनवलेल्या ‘घरगुती सुरक्षा कक्षा’चे विशेष कौतुक केले त्याचबरोबर संधाता व्यवसायात बनवलेले विविध वस्तू व वीटभट्टी साठी उपयुक्त अवजार तसेच वीजतंत्री द्वितीय वर्ष यांनी बनवलेले हायड्रोजन रिफ्लेक्टर यांत्रिक मोटार गाडी व यांत्रिक डिझेल चे हायड्रोलिक लिफ्ट ड्रायव्हिंग मॉडेल विशेष लक्षवेधी ठरले.
हे तंत्र प्रदर्शन प्राचार्य शाम अंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली व एस. एस. पाटील, प्रतिभा शिंदे प्रभारी गटनिदेशक व सर्व निदेशकांनी विशेष मेहनत घेतली.
सदर प्रदर्शन दिनांक २३ व २४ डिसेंबर असे दोन दिवस सर्वांसाठी खुले असणार आहे.