जव्हार: हिंदू मुस्लिम धर्मियांचे ऐक्याचे प्रतिक असलेला जव्हार शहरातील ऐतिहासिक ५७२ वा उरुस शांततेत पार पडावा यासाठी शनिवारी दुपारी १२ वाजता प्रांत कार्यालय येथे सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर(आय. ए.एस.) यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान या उरुससाठी नगर परिषद, पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा मागोवा घेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. याची महती लक्ष्यात घेत सबंध महाराष्ट्र भरातून भाविक व देशभरातुन व्यापारी येथे दाखल होत असतात, शिवाय येथील स्थानिक घराण्याच्या परंपरा व सामाजिक ऐक्य विशेष मानले जाते हे ही नायर यांनी विशद केले.
२३ ते २५ सप्टेंबर या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे यांनी जव्हार वासियांना आवाहन केले शिवाय, कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा घडतांना आढळल्यास त्वरित पोलीस प्रशासनाला कळवा , कुणालाही पाठीशी न घालता कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाईल अश्या सूचना दिल्या. नगर परिषद मुख्याधिकारी मानिनी कांबळे यांनी शहरातील व्यवस्था बाबत प्रशासन सज्ज असल्याचे नमूद केले.
एस.टी.प्रशासनाला उत्सव काळात बस फेऱ्या ह्या शहर बाहेरील रस्त्याचा वापर करून व्हावा तर विद्युत विभागाला विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी नियोजन आखण्यात यावे असे सांगण्यात आले. उरूस जलसा कमिटीचे अध्यक्ष यांनी उत्सवाचे स्वरूप व महत्त्व विशद करून प्रशासनाचे सहकार्य मिळत असताना गावातील नागरिक देखील सहभाग देतील अशी ग्वाही दिली.
या वेळी शहरातील हिंदू व मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, युवा वर्ग, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जव्हार तहसीलदार लता धोत्रे, मुख्याधिकारी मानिनी कांबळे , पोलीस निरीक्षक किशोर मानभाव, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे तसेच महसूल, नगर परिषद, विद्युत विभाग, एस.टी. विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.