सागर पाटील / उप-संपादक – दक्ष पोलीस वार्ता न्यूज , नाशिक
अंजनी धरणाजवळ एका तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २९) घडली. रात्री ९ वाजताच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळल्याने ही घटना घडली.
या अपघातात जळगाव येथेकार्यरत असलेले आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक तसेच लोकमत शौर्य पुरस्कार विजेते अंबडगांव नाशिकचे भूमिपुत्र सुदर्शन दातीर व चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले. अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडली आहे. हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणाच्या तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मयत एपीआय सुदर्शन दातीर हे अंबड येथील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. रात्री अनेक गावकरी वाहनाने जळगावकडे रवाना झाले. दातीर यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक लहान मुलगा असा परिवार आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा ते पोलीस अधिकारी अशी ओळख तयार केलेल्या दातीर यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037