सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक
शाळा भरली, मात्र विठूनामाचा गजर करत, नामसंकीर्तनाचा सोहळा रंगला’, वारकर्यांच्या वेशभूषेतील व पांढऱ्या सदऱ्यातील शाळकरी मुले, महाराष्ट्रीयन पेहरावात साड्या नेसलेल्या विद्यार्थिनी अशा विठ्ठलमय वातावरणात नाशिक शहरातील ध्रुवनगर, गंगापूर येथील बच्छाव फॉउंडेशन संचालित रेन्बो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शाळकरी वारकऱ्यांची वारी पार पडली. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी या वारीचे आकर्षण ठरले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही नाशिकच्या रेन्बो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकर्यांचे पोशाख परिधान केले होते. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुले-मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी सदर स्कूलमध्ये अवतरले.
यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पहायला मिळाले. दोन वर्षे कोरोनामुळे खंड पडलेल्या दिंडीला या वर्षी पुन्हा सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शाळा परिसरात एकच आनंद उत्सव साजरा केला. यावेळी जवळजवळ ६०-७० विद्यार्थी यांनी वारकर्यांची वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभागी झाले होते. शाळा परिसरात पंढरपूर भेटीच स्वरूप प्राप्त झाले होते. त्याचबरोबर वरूण राजाने देखील यावेळी आपली कृपा बरसवत हा आनंद द्विगुणित केला.
रेन्बो किड्स इंग्लिश मिडीयम स्कुलची ७ वर्षाची परंपरा
गेल्या सात वर्षांपासून रेन्बो किड्स इंग्लिश मिडीयम स्कुलच्या माध्यमातून दरवर्षी दिंडीचे आयोजन केले जाते. त्या त्या वेळी पाऊसाने आम्हाला साथ दिली आहे. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना संस्कृती, परंपरांचे दर्शन या सोहळयातून घडते. यामध्ये वारकऱ्यांच्या वेशभूषेत कु.शिवांश पाटील, कु.वेदांती मोंढे, युगांत भोये व इतर सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत होते.
यावेळी बच्छाव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व रेन्बो किड्स इंग्लिश मिडीयम स्कुलचे संचालक श्री.राहुल बच्छाव, बच्छाव फाउंडेशनच्या सचिव पूजा बच्छाव, शिक्षक, कर्मचारी, विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037