सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज,नाशिक
हनुमानांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी डोंगरावर झाला. अंजनेरी हे नाव देखील हनुमानाच्या आईच्या अंजनी मातेच्या नावावरूनच पडले असल्याचे जाणकार सांगतात. त्र्यंबकेश्वरमधील पर्वत रांगेतील ‘अंजनेरी’ महत्वाचा पर्वत आहे.
मारूतीरायांच्या या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येते. गडावरून बुधली नावाची अवघड वाटही खाली उतरते.
अंजनेरी गावातून किल्ल्यावर जाताना वाटेतच पायऱ्यांच्या जवळच गुहेत जैनधर्मीय लेणी आपल्याला दिसून येतात. पुढे पठारावर पोहोचल्यावर काही वेळातच अंजनी मातेचे मंदिर दृष्टीस पडते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त असून, मुक्काम करण्यासाठी देखील तिथे योग्य अशी सोय केली आहे.
बाल हनुमान लहानपणीही नटखट होते. त्यांच्या पराक्रमांना बालपणही रोखू शकले नाही. अगदी अजाणत्या वयातही त्यांनी सुर्याकडे झेप घेण्यासाठी आकाशात उंच उडी घेतली होती. तेव्हा त्यांच्या पायाचा ठसा या अंजनेरी पर्वतावर आहे. तिथे एक तळे निर्माण झाले असून त्याचा आकार मानवी पायासारखाच आहे.
तुम्ही बारकाईने तलावाकडे पाहिल्यावर तेव्हा तुम्हाला समजेल की डाव्या पायाचे निशाण आणि त्याची बोटं सूर्याच्या दिशेने आहे. या तळ्यात नेहमी पाणी असते. या पाण्याला स्पर्श करणे म्हणजेच हनुमानाच्या चरणाला स्पर्श करण्याचे पुण्य मिळाले असे सांगितले जाते.
समोर गेल्यावर आपल्याला अंजनी मातेची गुफा लागते. असे म्हटले जाते की अंजनी मातेने अनेक वर्ष भगवान शंकरांकडे पुत्र व्हावा म्हणून तपश्चर्या केली व त्यानंतर हनुमानजींचा जन्म झाला. अंजनी मातेने याच पर्वतावर हनुमानजींना जन्म दिला असे म्हटले जाते. अंजनी मातेच्या कुशीत असलेल्या हनुमान जी यांचे अशी एकमेव मूर्ती आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037