अन्य

सप्तश्रुंगी गडावर गुरुवारपासून चैत्रोत्सवानिमित्त खासगी वाहनांना प्रवेश बंदी

Spread the love

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

             साडेतीन शक्तीपिठातील अर्धेपीठ असलेल्या श्री सप्तश्रुंगी गडावर गुरुवारपासून चैत्रोत्सव सुरु होत आहे. सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन खासगी चारचाकी व दोनचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून भाविकांना गडावर जाण्यासाठी एस. टी. महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

                 नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी गड साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. नवरात्र असो चैत्रोत्सव असो सप्तश्रुंगी गडावर वर्षभर भाविकांची गर्दी असते. दरम्यान सप्तशृंगी गडावर ३० मार्च ते ६ एप्रिल पर्यंत चैत्र यात्रा उत्सव होत आहे. यात्रा उत्सवाच्या तयारी संदर्भात सप्तश्रुंगी देवीच्या कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या दरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी, दर्शन सुलभ होण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. सदर कालावधीत सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची फार मोठया प्रमाणावर गर्दी होते. गडावरील रस्ता घाटातून जात असून वळणा वळणाचा व अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे चैत्रोत्सव कालावधीत ऑटोरिक्षा व सर्व प्रकारच्या खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांना सप्तश्रृंगी गडावर प्रवेश बंदी करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. 

                     दरम्यान सप्तशृंगी गडावर ३० मार्च ते ६ एप्रिल दरम्यान चैत्रोत्सव होत असल्याने प्रांत तथा सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, तहसीलदार बंडू कापसे, ट्रस्टचे सहायक व्यवस्थापक भगवान नेरकर, कळवणचे गटविकास अधिकारी नीलेश पाटील यांच्या उपस्थितीत सर्व शासकीय व निमशासकीय विभागांची यात्रा नियोजन आढावा बैठक ट्रस्टच्या पहिल्या पायरी जवळील कार्यालयात घेण्यात आली. बैठकीत विविध विभागांनी यात्रा उत्सवात आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. ध्वज मिरवणूक ४ एप्रिलला होणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

नाशिक विभागातून २५० बसेस

                  उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तश्रुंगी मातेच्या चैत्रोत्सव गुरुवारपासून सुरुवात होत आहे. यात्रा उत्सव काळात गडावर प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसह भाविकांच्या वाहतुकीसाठी सुस्थितीत बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच भाविकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने जन सुरक्षा विमा काढण्यात आला असून पदयात्रेकरुंना निवाऱ्यासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहे. नांदुरी ते सप्तश्रुंगी गड दरम्यान शंभर बसेस तर नाशिक विभागातून २५० बसेस द्वारे यात्रा उत्सव काळात भाविकांची वाहतूक केली जाणार आहे. 

खासगी वाहनांना प्रवेश नाही

               दरम्यान उद्यापासून सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव सुरु होत असून लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ३० मार्च ते ६ एप्रिल पर्यंत खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. एसटीमध्ये भाविकांसह प्रवासी वाहतूक सुरू राहील. पायी दर्शन करण्यासाठी अनेक ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत