राजेंद्र कोल्हे / प्रतिनिधी, दक्ष पोलिस वार्ता, चांदवड.
चांदवड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा रंगमहाल पर्यटकांना बघण्यासाठी सुरु करण्यात यावा या मागणीचे निवेदन होळकर घराण्याचे युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर महाराज यांना दि. ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने देण्यात आले.
चांदवड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ऐतिहासिक वास्तू रंगमहाल मागील ७ ते ८ वर्षांपासून बंद आहे. पुरातन रंगमहाल चांदवड शहराची शोभा आहे. या ऐतिहासिक भव्य वाड्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वास्तव्य होते. यामुळे या वाड्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. रंगमहालामुळे चांदवड शहराला ‘ऐतिहासिक गाव’ ही ओळख मिळाली आहे. रंगमहालाची रचना, बांधकाम, नक्षीकाम, कोरीवकाम बघण्यासाठी देश – विदेशातून असंख्य पर्यटक रंगमहाल बघण्यासाठी येतात, रंगमहालाबद्दल जाणून घेण्यासाठी येतात. परंतु, रंगमहाल बंद असल्याने त्यांचा हिरमोड होतो व त्यांना रंगमहाल न बघताच येथून नाराज होऊन परत जावे लागते. असंख्य पर्यटक मोठ्या श्रद्धेने रंगमहाल बघण्यासाठी येतात. परंतु, रंगमहालाचे बंद दरवाजे बघूनच त्यांना निघून जावे लागते. रंगमहाल पर्यटकांसाठी सशुल्क सुरु करण्यात यावा व या शुल्काच्या जमा झालेल्या रकमेतून रंगमहालाचे जतन व संवर्धन करावे. पुरातन खात्यानेही रंगमहालाचे संवर्धन करुन निगा राखावी.
ऐतिहासिक पुरातन वास्तू रंगमहाल लवकरात – लवकर पर्यटकांना बघण्यासाठी सुरु करण्यात यावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने रंगमहालासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037