अन्य

मस्तच! लालपरीतून आता करता येणार आरामदायी प्रवास ; नवीन एसटी बसमध्ये काय आहे खास

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

                  राज्यातील मोठा प्रवासी वर्ग साध्या एसटी गाड्यांतून प्रवास करतो. या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या साध्या गाड्यांमध्ये पुशबॅक बकेट आसने बसवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. ही सुविधा प्रवाशांना साध्या दरात उपलब्ध होणार आहे. दोन हजार बस खरेदी प्रक्रियेला महामंडळाने सुरुवात केली आहे. जून २०२३ अखेर ३,२०० साध्या बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

                 एसटी महामंडळात साध्या गाड्यांची संख्या अपुरी आहे. एसटीचा तोटा कमी करण्यासाठी हजारो विद्युत बसगाड्यांचा ताफ्यात समावेश करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. मात्र तातडीने बसगाड्या उपलब्ध होण्यासाठी डिझेलवर धावणाऱ्या २,००० बस चेसिस घेण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक बी-६ प्रकारातील इंजिन असलेली ११ मीटर लांबीची ही बस आहे. चेसिस खरेदी करून त्यावरील ढाच्याची महामंडळाच्या कार्यशाळेत बांधणी करण्यात येणार आहे. दोन हजार बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या बस खरेदीसाठी ७०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी राज्य सरकारकडून देण्यात येईल. बसगाड्या ग्रामीण भागातून शहरांना जोडण्यासाठी लांब पल्ल्याच्या मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे. साध्या बसची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जून २०२३ अखेर या बसगाड्या महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे नियोजन आहे असे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले.

खडखडाटही थांबणार

                   ग्रामीण भागात रस्ते सुस्थितीत नसल्याने काचांच्या तावदानांचा खडखडाट होतो. हा आवाज रोखण्यासाठी नव्या गाड्यांमध्ये काचा उच्च प्रतीच्या रबरी मोल्डमध्ये बसविण्यात येणार आहेत. यामुळे गाड्यांचा खडखडाट थांबणार आहे, असा दावा एसटी अधिकाऱ्यांनी केला.

साध्या गाड्या लाल रंगातच

                       साध्या गाड्या लाल रंगातच असणार आहेत. या पूर्वी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावत यांनी साध्या गाड्यांच्या रंगसंगतीत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लाल आणि पांढऱ्या रंगसंगतीमध्ये गाड्या दाखल झाल्या आहेत.

अशा आहेत ३,२०० बसगाड्या

– २ हजार गाड्यांची निविदा प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण होईल. जून २०२३अखेर या गाड्या महामंडळात दाखल होणार आहेत

– स्वमालकीच्या ७०० साध्या बसगाड्यांची बांधणी एसटी महामंडळाच्या दापोडी(पुणे), चिकलठाणा (औरंगाबाद), हिंगणा (नागपूर) या मध्यवर्ती कार्यशाळांत सुरू आहे. बांधणी पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने गाड्या प्रवासी सेवेत दाखल होतील.

– भाडेतत्त्वावरील ५०० साध्या बस लातूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सांगली, पुणे या विभागांसाठी दाखल होणार आहेत. यांपैकी काही गाड्या दाखल झाल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत