सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक
समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलायमसिंह यादव यांना २२ ऑगस्ट रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. २ ऑक्टोबरपासून ते व्हेटिंलेटरवर होते. आज सकाळी ८.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
मुलायमसिंह यादव यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना २२ ऑगस्ट रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीत चढ-उतार पाहायला मिळत होते. १ ऑक्टोबर रोजी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी मेदांता हॉस्पिटलच्या पीआरओने सांगितले होते की, युरिन इन्फेक्शनबरोबरच मुलायमसिंह यादव यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते.
दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती ढासाळली. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. तसेच त्यांची किडनीही व्यवस्थित काम करत नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या दोन वर्षांपासून मुलायमसिंह यादव यांचे आजारपण सुरू होते. यापूर्वी त्यांना अनेकदा मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अलीकडेच म्हणजे २४ जून २०२२ रोजी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे नियमित तपासणी व उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.
पत्नीचं जुलैमध्ये निधन
मुलायमसिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचं यावर्षी जुलैमध्ये निधन झाले होते. त्यांच्या फुफ्फुसांत संसर्ग झाल्याने गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साधना मुलायमसिंह यादव ह्या यादव यांच्या दुसरी पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांचं २००३ मध्येच निधन झालं होतं.
नेताजींचा जीवनक्रम
मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी झाला. पाच भावंडांमध्ये मुलायमसिंह यादव तीन क्रमाकांचे होते. करिअरच्या सुरुवातीला ते पैलवान होते. तर पेशाने ते प्राध्यापक होते. काही वर्षे त्यांनी इंटर कॉलेजमध्ये शिकवण्याचं काम केलं. त्यांच्या वडिलांना त्यांना पैलवान बनवायचे होते. मात्र, गुरू नत्थू सिंह यांच्या प्रभावाने मुलायमसिंह यादव राजकारणात आले. जसवंतनगर विधानसभेच्या जागेवरून त्यांनी पहिली निवडणूक लढवली. १९८२-१९८५ पर्यंत ते विधानपरिषदेचे सदस्य राहिले.
लोहिया आंदोलनात मुलायमसिंह यादव यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्याच काळात त्यांनी ४ ऑक्टोबर १९९२ रोजी समाजवादी पक्षाची स्थापना केली. राजकीय आखाड्यातील पैलवान म्हणून मुलायमसिंह यादव यांची ओळख होती. आरोप-प्रत्यारोपांमध्ये ते माहीर होते. त्यांनी तीन वेळा राज्याची कमान सांभाळली. ते देशाचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. उत्तर प्रदेश विधानसभेचे ते आठवेळा सदस्य राहिले.
१९६७ साली मुलायमसिंह यादव पहिल्यांदा आमदार बनले. त्यानंतर, ५ डिसेंबर १९८९ साली पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे ते मुख्यमंत्री बनले. सोशलिस्ट पार्टी, प्रजा सोशलिस्ट पार्टी असा प्रवास करत समाजवादी पक्षाची त्यांनी स्थापना केली. १९६७, १९७४, १९७७, १९८५,१९८९ मध्ये ते विधानसभेचे सदस्य होते. तर, १९८९, १९९३ आणि २००३ मध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
१९९६ मध्ये निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले. २००४ रोजी ते मनपुरीतून लोकसभा निवडणूक लढले. २०१४ मध्ये त्यांनी आजमगढ आणि मैनपुरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. महत्त्वाचं म्हणजे, दोन्ही मतदारसंघातून ते जिंकून आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी यश संपादन केलं.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037