*नाशिकरोड वडिलांच्या मृत्यूची वार्ता ऐकताच दु:खी झालेल्या तरुणीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जेलरोड येथे घडली!*
या घटनेनंतर बापलेकीची अंत्ययात्रा एकाचवेळी काढण्यात येऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मारूती वाघमारे (रा.ब्रह्मगिरी सोसायटी, भीमनगर, जेलरोड, नाशिकरोड) हे पत्नी, मुलगा, एक विवाहित व एक अविवाहित मुलगी यांच्यासह राहत होते. दरम्यान, वाघमारे यांची मोठी मुलगी दसक परिसरात राहते. तिच्या घराचे बांधकाम सूरू असल्यामुळे तिच्या आठ वर्षाच्या मुलीसह वडिलांच्या घरी राहात होती.
गुरूवारी मारूती वाघमारे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्यांच्या मुलाने बिटको रुग्णालयात उपचाराचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी त्यांची पत्नी, मुलगा व विवाहीत मुलगी असे तिघेजण दवाखान्यात होते. दरम्यान, उपचार सुरू असताना वाघमारे यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ही वार्ता घरी असलेली त्यांची अविवाहीत मुलगी प्रिती वाघमारे (वय 29) ही मोठ्या बहिणीच्या मुलीसह घरी एकटीच होती. ही वार्ता समजल्यानंतर ती वडिलांच्या निधनाने भावनाविवश झाली.
त्यावेळी घराच्या हॉलमध्ये तिचा भाऊ व मोठी बहिण ही मोबाईल फोनद्वारे इतर नातेवाईकांना वडिलांच्या निधनाची माहिती देत होती. त्याचवेळी दु:ख सहन न झाल्याने प्रिती वाघमारे हिने घरातील कॅनमध्ये असलेले रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतून पेटवून घेतले. ही घटना तिच्या सोबत असलेल्या आठ वर्षीय मुलीने पाहिल्याने तिने जोरात आराडाओरड करून घराबाहेर येऊन आईला व मामाला ही घटना सांगितली. तोपर्यंत या तरुणीला आगीने वेढले होते.
आग विझविण्याचा प्रयत्न करत तिचा भाऊ सचिन वाघमारे याने तिला औषधउपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉ. धनवटे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, काल सायंकाळी वडिलांसह तरुणीचीही अंत्ययात्रा एकाचवेळी काढण्यात येऊन दोघांवर दसक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबकगिर गोसावी हे करीत आहेत.