दिनेश गोसावी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता, निफाड
दिल्ली येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी सदिच्छा भेट घेतली. निफाड तालुक्यासह नाशिक जिल्हयातील शेतकऱ्यावर निसर्गाच्या प्रकोपामुळे व शासननिर्मित समस्यांची चर्चा करण्यात आली. निफाड तालुक्यातील कांदा व टोमॅटो उत्पादकांच्या व्यथा अनिल कदम यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडत कवडीमोल दराने विक्री होत असलेल्या टोमॅटो व कांद्याच्या प्रश्नाबाबत शरद पवार यांनी हस्तक्षेप करून केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा जाब विचारावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बाजार समिती बंदमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची माहिती यावेळी त्यांनी शरद पवार साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. भाजपच्या केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कवाढ केल्याने कांदा व्यापाऱ्यांची मनमानी सुरु असून नाफेडमार्फत झालेल्या कांदा खरेदीचा निफाड तालुक्यातील शेतकरयांना कोणताही लाभ झाला नसल्याची खंत अनिल कदम यांनी शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थीती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील या सर्व परिस्थितीचा आढावा शरद पवार यांनी अनिल कदम यांच्याकडून जाणून घेतला. निफाड मतदारसंघात येण्याचे निमंत्रण यावेळी अनिल कदम यांनी शरद पवार यांना देताच त्यांनीही तातडीने सकारात्मत प्रतिसाद देत निफाडला येण्याचे आश्वासन अनिल कदम यांना दिले.
निफाड तालुक्याचे माजी आमदार अनिल कदम यांनी राष्ट्रवादिचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतल्याने नाशिक जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र कांदा व्यापारांच्या बाजार समिती बंदच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे त्यामुळे आपण केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा व टोमॅटो उत्पादकांच्या भावना शरद पवार यांच्यासमोर भेटीदरम्यान मांडल्या आहेत. यावेळी शरद पवार साहेबांनी आपली व कदम परिवाराची आस्थेने विचारपूस करत चौकशी केली. मात्र यावेळी कोणतीही राजकिय चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण अनिल कदम यांनी दूरध्वनीद्वारे दिले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037