सागर पाटील /उप संपादक -दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक
नाशिक येथे १२ ज्योतिर्लिंगांपैकी अतिप्राचीन मंदिर म्हणून ओळख असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. यामुळे येथे दररोज हजारो भाविकांची रेलचेल असते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर, संत निवृत्तीनाथ मंदिर, कुशावर्त तीर्थ, ब्रह्मगिरी आदी पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. यातील अनेक भाविक या ठिकाणी पूजाविधी करण्यासाठी येत असतात. दरम्यान हे मंदिर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते पुन्हा हे मंदिर चर्चेत आले. कारण मंदिरातील मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याचे समजताच भाविकांनी हा चमत्कार पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली. मात्र नाशिक पोलिसांनी त्र्यंबकेश्वरच्या पिंडीवरील चमत्कारिक बर्फ हा खरा की खोटा याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
नाशिक जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वारसा असलेले मंदिरे आहेत. अंजनेरी येथील मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे प्राचीन मंदिर, गोदाघाट, काळाराम, गोराराम यासारख्या मंदिराचा खास वारसा येथे लाभलेला आहे. त्यातच त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे प्राचीन मंदिर येथे पिंडीवर बर्फ जमा झाल्याचे सांगण्यात येत होते.
दरम्यान त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील शिवपिंडीत बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला होता. ३० जून २०२२ रोजी समाजमाध्यमांत प्रसारित झालेल्या या व्हिडिओबाबत पोलिस तपास केला असता, या तपासामध्ये पोलिसांना एका पुजाऱ्यानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याच निष्पन्न झालंय. तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका पुजाऱ्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय.
तसेच देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने सत्यता पडताळून पाहतांना नेमलेल्या चौकशी समितीने त्र्यंबकेश्वर मंदिरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत खोटा प्रचार केला म्हणून सुशांत तुंगार आणि त्याला मदत करणारे आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर भा.दं.वि. कलम ५०५ (३), ४१७ आणि १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037