अन्य

नाशिक-त्र्यंबक रोड दिंडयांनी फुलला; निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त त्र्यंबक नगरीत लाखो वारकर्‍यांचा मेळा; ट्रस्टचे नियोजन पूर्णत्वास-अध्यक्ष निलेश गाढवे

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

              त्र्यंबकेश्वरमध्ये होणा-या पौषवारीनिमित्त राज्यभरातून वारकरी भाविकांच्या दिंडया त्र्यंबकश्वरमध्ये दाखल होत आहेत. दोन वर्षांनंतर वारकरी संत निवृत्तीनाथ महाराज भेटीचा सोहळा पार पडणार असून यासाठी त्र्यंबकेश्वर प्रशासन आणि निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे.

                  श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर संस्थांचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष निलेश गाढवे यांनी दिली. १८ जानेवारीला होणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी ५०० दिंड्या आणि चार लाख भाविक व वारकरी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टने कृत्रिम तात्पुरत्या स्वरूपातील दर्शन बारीचे काम पूर्ण केले आहे.

               येत्या १६ ते २० जानेवारी दरम्यान त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव होणार आहे. सध्या मंदिराच्या जिर्णोधाराचे काम सुरू आहे. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या प्रसाद योजनेअंतर्गत मंदिर परिसरात कामे सुरू आहेत. यात्रा काळात राज्याच्या कानाकोपर्‍यातून वारकरी त्र्यंबक नगरीत दाखल होतात. त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थानच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.

               श्री संत निवृत्तीनाथ मंदिराचा प्रसाद योजनेच्या माध्यमातून परिसर विकास सुरू असून बांधकामे सुरू आहेत. अश्या परिस्थितीत वारकरी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंडप उभारून दर्शन बारी ट्रस्टने कृत्रिम रित्या निर्माण केली आहे. भाविकांनी पूर्व बाजूने रांगेने महाद्वाराने मंदिरात जावयाचे असून पश्चिम दरवाजाने बाहेर पडायचे आहे. रांगेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे.

                 उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांनी दर्शन रांगेला भेट देऊन पाहणी केली. तसेच ट्रस्टला आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी ट्रस्ट सचिव सोमनाथ घोटेकर व मंदिर पुजारी गोसावी, अमित ठोमरे हे उपस्थित होते. पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व विश्वस्त येथे यात्रा काळात तळ ठोकून राहणार आहे. जोडीला यात्रेपूर्ती उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. विश्वस्तांकडून यात्रेकरू दिंड्यांचे स्वागत केले जाणार आहे. दिंड्यांना मुखदर्शन घेता येणार असून तात्पुरत्या स्वरूपात सभा मंडप उभारण्यात आला आहे.

                    पोलीस प्रशासनाकडून उत्सव काळात गर्दी होऊ नये यासाठी दुभाजक मागून मंदिर परिसर बंदिस्त करण्यात आला आहे. मानाच्या दिंड्यांसाठी राहुट्यांची व्यवस्था करण्यात येणार असून श्रीफळ प्रसाद देऊन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष निलेश तुकाराम गाढवे यांनी दिली.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत