सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने शनिवार (दि.२४) पासून मास्क सक्तीचे जाहीर करताच प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक आणि भाविकांमध्ये मास्क लावण्यावरून सातत्याने खटके उडत आहे. तर मास्क लावलेल्या भाविकांची संख्या तुरळक आहे. काहींनी केवळ रांगेत प्रवेश मिळवण्यासाठी ओढणी, रूमाल अशा स्वरुपात मास्क लावले तर प्रवेश मिळताच तेही काढुन टाकले. त्यामुळे मास्कसक्तीचा पहिला दिवस फोल ठरल्याचे पहावयास मिळाले.
ञ्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी लागलेली रांगा दर्शनबारी मंडप सोडून बाहेर पोहचते. वीस ते पंचवीस हजारांपेक्षा अधिक भाविक येथे दररोज हजेरी लावत आहेत. गर्भगृहाची भौगोलीक रचना आणि रांगांच्या नियोजनाचा विचार करता दिवसभरातून समाधानकारक दर्शन होत नाही. अनेकदा तर रांगेतील भाविक गर्भगृहाच्या समोर येताच त्यांना आल्यापावली परतावे लागते. क्षणभर उभे राहणे देखील शक्य होत नाही. या कारणावरून सुरक्षारक्षक आणि भाविकांमध्ये सतत वाद होत राहतात. सुरक्षित अंतराचे नियमांचे पालन केल्यास भाविकांची रांग मोठी होण्याची शक्यता असून दर्शनासही अडचणी उद्भवत आहे.
गर्भगृहातील दर्शन बंद होण्याची शक्यता
गर्भगृहात प्रवेश करून पिंडीचे दर्शन घेण्याची अनेक भाविकांची इच्छा असते. त्यासाठी सकाळच्या ठरावीक वेळेत प्रवेश दिला जातो. मात्र कोरोनाचे सावट निर्माण झाल्याने गर्भगृहात त्रिकाल पूजा व्यतिरिक्त अन्य भक्तांना प्रवेश बंद करण्याची शक्यता देवस्थान ट्रस्टने व्यक्त केली आहे. कोरोनाचा उद्रेक पाहता येत्या एक दोन दिवसात त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता ट्रस्टतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
नारायण नागबली विधीसाठी गर्दीत वाढ
कोविड कालावधीत नारायण नागबली आणि इतर विधी बंद होते. अनेक भाविकांची कार्य त्यामुळे थांबले होती. पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोणत्याही कार्यक्रमास एकत्र येण्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पुन्हा खोळंबा नको म्हणून येथील पुरोहितांकडे पूजा विधी करिता विचारणेत वाढ झाली आहे. तसेच नारायण नागबली, त्रीपींडी श्राध्द, कालसर्प, पितृदोष निवारण सारखे धार्मिक विधी करण्यासाठी दोन दिवसांपासून भाविकांचा ओघ वाढला आहे. कुशावर्तावर आणि अहिल्या गोदावरी संगम घाट परिसरात गर्दीचा ओघ वाढला आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037