सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक
सटाणा तालुक्यातील वेरूळे गावातील उंबरदरी वस्तीत राहणार्या वृद्ध मामा-मामीची भाच्याने कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ९० वर्षीय नारायण मोहन कोल्हे आणि ८५ वर्षीय पत्नी सखूबाई नारायण कोल्हे यांची त्यांचाच भाचा संशयित रामदास भोये यानेच त्यांचा खून केल्याचे शनिवारी (दि.३) सकाळी पोलीस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध दामपत्याचा मुलगा अमरचंद नारायण कोल्हे डोंगरदेवाचा उत्सव सुरू असल्याने गावी आले होते. त्यावेळी वेरूळे येथील उंबरदरी शेतवस्तीत राहणार्या वृद्ध आई वडिलांना भेटण्यासाठी तसेच त्यांनाही उत्सवात घेऊन जाण्यासाठी घरी पोहचले. सकाळच्या सुमारास घरी गेले असता, त्यांना त्यांच्या आईचा मृतदेह घराबाहेर तर वडिलांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे दिसले. हे सगळं दृश्य बघून घाबरलेल्या अमरचंद यांनी गावकर्यांच्या मदतीने याबाबत आभोणा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत तपासाला सुरवात केली.
घटनेच्या तपासासाठी आभोणा पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञ यांना पाचारण केले. ही दोन्हीही पथक दुपारी दाखल झाल्यानंतर तपासाला गती आली. श्वान पथकातील श्वानाने काही वेळातच घटनास्थळापासून काहीच अंतरावर गुन्ह्यात वापरलेली कुर्हाड शोधली. त्यानंतर कुर्हाडीच्या सहाय्याने घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर शेतामध्ये फिरत असलेल्या संशयित रामदास भोये याकडे श्वान पथकातील श्वानाने निर्देशित केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अटक केलेला संशयित रामदास भोये हा कोल्हे दांपत्याचा भाचा आहे. त्याने हा खून का केला याबाबत अधिक तपास आभोणा पोलीस करीत आहेत.
अशा निर्घृणपणे वयोवृद्ध दांपत्याची हत्या करण्यात आल्याने तसेच त्यांच्याच नात्यातील इसमाने ती केल्याने कसमादे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच हळहळही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घटनास्थळी भेट देत आढावा घेत तपास पथकाला सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037