राज्यस्तरीय आदर्श माता पुरस्कार कणकोरी गावातील सौ. सुशीला सांगळे यांना जाहीर
प्रसिद्ध कवयित्री व लेखिका तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नरच्या कोषाध्यक्ष व के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी व मराठी विभाग प्रमुख डॉ. मंगल कचरू सांगळे व दक्ष पोलीस वार्ताचे पत्रकार सुरेश कचरू सांगळे यांच्या मातोश्री सौ. सुशीला कचरू सांगळे यांना कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील यशोदा प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श माता पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. स्वतः अशिक्षित असूनही गरिबीशी दोन हात करून आपल्या अपत्यांवर सुसंस्कार करून त्यांना आदर्श नागरिक बनविण्यासाठी नेहमीच कृतिशील असणाऱ्या माऊलीचा सन्मान म्हणून सदर पुरस्कार जाहीर झाला असल्याचे यशोदा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राम गायकवाड यांनी निवडपत्राद्वारे कळविले आहे. समाजात सुसंस्कारांचे बीज पेरणाऱ्या सौ. सुशीला सांगळे ह्या तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून गावोगावी हिरवळ फुलविणाऱ्या डॉ. मंगल सांगळे यांच्या मातोश्री असून त्या स्वतः देखील तरुप्रीत प्रकल्पात नेहमीच कृतिशील असतात. त्यामुळे आपल्या मुलांना संस्कारित करण्यासोबतच त्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचेही काम करत आहे. सदर बाब प्रेरणादायी आहे.
सौ. सुशीला सांगळे यांनी शेतात मोल मजुरी करून तसेच विहिरींचे खोदकाम, रस्त्यांची कामे अशी कष्टप्रद कामे करून आपल्या कुटुंबाचा आधार बनल्या. त्यांना यासाठी त्यांचे पती कचरू नथू सांगळे यांची खंबीरपणे साथ लाभली. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कणकोरी गावचे सरपंच रामनाथ पुंजा सांगळे, उपसरपंच सुरेश झुंबर थोरात, पोलीस पाटील सौ. सुनीता विनायक बुचकूल, ग्रामविकास अधिकारी योगेश सोनवणे, तलाठी तृप्ती खोकड, लता आंधळे, मीना केकाणे, इंदू कुटे, सिंधू धात्रक यांनी देखील सदर बाब गावाकरिता व समाजाकरिता अभिमानास्पद असल्याचे सांगत अभिनंदन केले आहे.
सदर पुरस्काराचे वितरण ४ जून रोजी शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय साहित्यकृती पुरस्कार सोहळ्यात येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे यशोदा प्रतिष्ठानकडून कळविण्यात आले आहे. श्री.सुरेश कचरू सांगळे दक्ष पोलीस वार्ता न्यूज सिन्नर ग्रामीण*
