महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शनासाठी क्लासेस संघटना दत्तक घेणार*
प्रतिनिधी माजिद शेख नाशिक नाशिक महानगरपालिकेच्या शहरातील अनेक शाळांमध्ये माध्यमिक शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी हुशार असतात पण आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना अधिकचे मार्गदर्शन मिळण्यासाठी कोचिंग क्लासेस लावता येत नाही. अशा विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पुढे येणार असून शहरातील विविध विभागांत दहावीपर्यंत क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांची यादी महापालिका शिक्षणविभागाला देईल. त्या त्या भागातील गरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांची यादी महापालिका त्या शिक्षकांकडे देईल. प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना हे शिक्षक मोफत शिकवणी घेतील. नोट्स, पुस्तके विनामूल्य देतील व मुख्य प्रवाहातील विद्यार्थ्यांसोबत हे विद्यार्थी चांगले यश मिळवून आपले, डॉक्टर इंजिनिअर किंवा तत्सम उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करतील. आज महापौर हिमगौरी आहेर-आडके यांना तसा प्रस्ताव संघटनेतर्फे देण्यात आला. यावेळी खजिनदार रविंद्र पाटील, उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, किशोर सपकाळे, प्रतिभा देवरे, विद्या राकडे, लोकेश पारख तसेच राज पवार, करियर कौन्सिलर योगेश बाहेती, अर्जुन शिंदे, गौरी मैंद आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या ३१ मे च्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.
