रवी जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता, चिंचखेड

उद्यापासून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त नाशिकचे सुप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार अनंत (बाळा) सरोदे व अनिरुद्ध जाधव यांच्या जंगलवारी छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन उद्या रविवार दि.१ व २ ऑक्टबरला करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील कुसूमाग्रज स्मारकातील आर्ट गॅलरीमध्ये उद्या रविवारी सकाळी १० वाजता प्रसिद्ध लेखक व छायाचित्रकार सतिश गोगटे यांच्या हस्ते जंगलवारी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निफाडचे माजी आमदार अनिल कदम, पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ.जगताप, दत्ताकाका उगावकर, किरण तांबट, अनिल माळी, आनंद बोरा, किशोर वडनेरे, जयंत फूलकर, डॉ उत्तम डेरले, वनाधिकारी गणेश रणदिवे, वनसंरक्षक देवकर आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
मानव वन्यजीव संघर्ष, निसर्ग संवर्धन, जैव विविधता या विषयांवर आधारित जंगलवारी हे प्रदर्शन आहे. पक्षीमित्र अनंत सरोदे यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे २०११ पासून नियमित जंगलसफारी करुन वन्यजीवांच्या विविध भावमुद्रा आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या आहे. वाघ आणि जंगल याचे कुतूहल व जिज्ञासेतून गेली १३ वर्षे अनंत सरोदे यांनी पेंच, उमरेड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कर्नाटक दांडेली, गुजरात गीर, उत्तराखंड गंगोत्री राष्ट्रीय उद्यान आदी ठीकाणी जंगलवारी करत तेथील वन्य प्राण्यांचे छायाचित्र टिपले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनंत (बाळा) सरोदे यांच्या कॉफी टेबल बुक या ताडोबातील व्याघ्र पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले होते. ठाणे येथील प्रदर्शनातही अनंत सरोदे यांच्या उत्कृष्ठ छायाचित्रांचा गौरव महापालिकेने केला आहे. नाशिककरांनी दोनदिवसीय जंगलवारी छायाचित्र प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन छायाचित्रकार अनंत सरोदे व अनिरुद्ध जाधव यांनी केले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

