सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक

समुद्राला खोली असते, पण उंची नसते. आकाशाला उंची असते, परंतु खोली नसते. पण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् हे असे जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ होते की, त्यांच्या विचारांना खोली आहे आणि तेवढीच उंची देखील आहे. पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ व शिक्षक म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रपती होण्यापूर्वी ते सुरुवातीला प्राध्यापक, प्राचार्य व तदनंतर विद्यापीठाचे कुलगुरू होते. केव्हाही कुठेही व्याख्यानाला गेल्यानंतर त्यांच्यातील शिक्षक जागृत होत असे. हे शिक्षकपण किंवा गुरुपद त्यांच्या तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना मिळाले होते. पाच फूट अकरा इंच उंची, सडपातळ बांधा, गंभीर आणि तेजस्वी मुद्रा. दाक्षिणात्य पद्धतीचा पांढराशुभ्र टोकदार फेटा असे त्यांचे भारदस्त, रुबाबदार व्यक्तीत्व होते. शिक्षण क्षेत्रातील महान, ज्ञानतपस्वी, ऋषितुल्य व्यक्तीमत्व म्हणून डॉ. राधाकृष्णन् हे सर्वमान्य आहेत. त्यांच्या जीवन कार्याचा आढावा.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास इथल्या चित्तोरमध्ये तिरुत्तनी या खेड्यात झाला. हे गाव चेन्नई शहराच्या ईशान्येला ६४ कि.मी. अंतरावर आहे. मध्यमवर्गीय, ब्राह्मण तेलगू भाषिक कुटुंब. त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरस्वामी आणि आईचे नाव सीताम्मा होते. त्यांचे वडील ब्रिटिश आमदानीत तहसीलदार होते. सर्वपल्ली ही पदवी नाही की, राधाकृष्णन् यांचे आडनाव देखील नाही. तर कधीकाळी त्यांचे पूर्वज ‘सर्वपल्ली’ नामक गावी राहत होते. त्यामुळे वंशपरंपरेनुसार राधाकृष्णन् यांना सर्वपल्ली हे आपल्या पूर्वजांच्या गावाचे नाव कायमचेच नावापुढे जोडले गेले. डॉक्टर राधाकृष्णन् यांचे आडनाव अय्यर होते. राधाकृष्णन यांचे बाल वयातच लग्न झाले. त्यांच्या पत्नीचे नाव सिवकामू होते. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा होता. त्यांच्या घरात आणि आसपास धार्मिक वातावरण होते.
सर्वपल्ली राधाकृष्णन लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि स्वतंत्र विचारांचे व अंतर्मुख वृत्तीचे होते. लहान वयात वाचता येऊ लागल्यापासून त्यांना पुस्तके वाचण्याचा छंद लागला. ग्रंथच त्यांचे गुरू झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिरुत्तनी इथे व माध्यमिक शिक्षण तिरुपतीला मिशनरी स्कूलमध्ये झाले. मद्रास इथल्या ख्रिश्चन कॉलेजमधून ते प्रथम श्रेणीत बी. ए. ला काॅलेजमधून पहिले आलेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. मग नीतिशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. केले. पुढे ‘वेदान्तातील नीतिशास्त्र’ हा प्रबंध त्यांनी लिहिला. तेव्हा ते फक्त २० वर्षांचे होते. जागतिक कीर्तीचे प्राध्यापक ए. जी. हॉग यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. राधाकृष्णन पट्टीचे वक्ते होते. केंब्रिज विद्यापीठाने त्यांना भाषणासाठी आमंत्रित केले. ऑक्सफर्डमध्ये ऑप्टन व्याख्यानमालेत त्यांचे व्याख्यान झाले. त्यांच्या सर्व भाषणांचा संग्रह प्रसिद्ध आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने ‘राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट’ हा पुरस्कार ठेवला आहे. पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन त्यांना ओळखले जाते.
राधाकृष्णन यांना आंध्र विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी बहाल केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुरवातीला मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठात १९१८ ते १९२१ दरम्यान प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले. १९२१ ते १९३६ ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू होते. नंतर १९३९ मध्ये मदनमोहन मालवीय यांच्या सांगण्यावरून ते बनारस विद्यापीठाचे कुलगुरू झाले. तिथे ते प्रशासकीय कारभारही पाहत असत. अनेक वर्षं ते कुलगुरू होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी विद्यापीठाची प्रगती घडवून आणली. डॉ. राधाकृष्णन् यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?’ या तीन प्रश्नांमधून श्रेष्ठ जगण्याच्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. एक आदर्श व्यक्तीमत्व कसे असायला हवे याची दिशाच त्यांनी दर्शवलेली आहे. त्यांना नव्हे तर सर्वांना हे प्रश्न पडले तर उत्तरांच्या अपेक्षित मनुष्य अर्थपूर्ण असे जीवन जगू शकेल. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे डॉक्टर राधाकृष्णन् यांच्या मते नव समाज निर्मितीचा पाया शिक्षण हाच आहे. शिक्षणाशिवाय व्यक्तीचा, समाजाचा व पर्यायाने राष्ट्राचा विकास होऊच शकत नाही. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व, चारित्र्य घडवणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. मुलांबरोबर मुलींनाही शिक्षणाचा हक्क दिला पाहिजे स्त्रियांचा उचित सन्मान होणे आवश्यक आहे. असे त्यांचे विचार होते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षणाची पुनर्रचना करणे आवश्यक होते. त्यासाठी भारतातील सर्व विद्यापीठांची पाहणी करणेकामी १९४८ साली विद्यापीठ आयोग नियुक्त केले गेले. या आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची नियुक्ती झाली. हा आयोग ‘राधाकृष्णन् आयोग म्हणून ओळखला जातो. जागतिक स्पर्धेत भारतीय अव्वल स्थानावर टिकून रहावे म्हणून या आयोगाच्या शिफारशीनुसार पदवी पर्यंत इंग्रजी विषय सक्तीचा करण्यात आला. राधाकृष्णन् सन १९५२ ते १९६२ सलग दहा वर्ष भारताचे उपराष्ट्रपती होते. उपराष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात त्यांनी उत्कृष्ट काम करून नावलौकिक मिळवला. त्याचवेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू होते. १९५२ मध्ये ते युनेस्कोचे अध्यक्ष होते. एकाच वेळी तीन पदांवर ते कार्यक्षमतेने कार्य करीत होते. उपराष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यावर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कुशलतेने कार्य केले. १९५८ साली त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च किताबाने त्यांचा गौरव करण्यात केला गेला व त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. १९६२ ते १९६७ पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद अतिशय कार्यक्षमतेने सांभाळले. त्यावेळी राष्ट्रपतींना दरमहा दहा हजार रुपये मानधन होते. त्यात कपात करून त्यांनी अडीच हजार रुपये मानधन घेण्याचे घोषित केले. तसेच सिमला या थंड हवेच्या ठिकाणी असलेले वैभवशाली प्रासाद व शाही जीवन त्यांनी नाकारले. राष्ट्रपती पदाची पाच वर्षाची मुदत संपल्यावर त्यांचे शिक्षक व तत्त्वचिंतक म्हणून व्यक्तिमत्व कायमच अबाधित राहीले. २४ एप्रिल १९७५ रोजी वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाले. एक हाडाचा शिक्षक, तत्त्वचिंतक, प्रज्ञावान लेखक, थोर आचार्य, विद्यावाचस्पती, प्रतिभावंत व्याख्याते, शिक्षणतज्ञ, अलौकिक, दैदिप्यमान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले डॉ. राधाकृष्णन् ऋषितुल्य तपस्याची जीवन जगले. म्हणून पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना ‘तत्त्वज्ञ राजा’ म्हणून संबोधित होते. ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती’. डॉ. राधाकृष्णन् यांच्या पवित्र स्मृतीस शतशः नमन….
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

