भद्रकाली मटण व फिश मार्केटची निविदा रद्द करण्यापूर्वी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्या
सर्वधर्मीय व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न राजकारणाचा विषय करू नका – सुफी जीन
. प्रतिनिधी जुल्फेखार शेख नासिक
नाशिक, दि. ६ सप्टेंबर २०२६ : प्रभाग क्र. १४ मधील भद्रकाली येथील मटण व फिश मार्केटच्या बांधकामासाठी प्रस्तावित सुमारे ५ कोटी रुपयांची ई-निविदा रद्द करण्याचे आदेश महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी दिले आहेत. या निर्णयासंदर्भात स्थानिक नगरसेवकांनी महापौर व महापालिका आयुक्तांकडे लेखी हरकत नोंदविली असून, त्यांचा अभिप्राय विचारात न घेता अंतिम निर्णय घेऊ नये, अशी मागणी काँग्रेस गटनेते तथा नगरसेवक सुफी जीन यांनी केली आहे.
भद्रकाली व महात्मा फुले मार्केट परिसरात सर्वधर्मीय व्यापारी अनेक वर्षांपासून एकोप्याने व्यापार-व्यवसाय करीत असून, त्यांच्या कुटुंबांची रोजीरोटी याच व्यवसायावर अवलंबून आहे. जुने व जीर्ण मार्केट, अस्वच्छता, दुर्गंधी, तुटलेल्या भिंती आणि ग्राहकांची घटती संख्या यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मार्केटचे आधुनिकीकरण व मूलभूत सुविधांची कामे ही व्यापाऱ्यांच्या हिताची आणि सार्वजनिक गरजेची आहेत.या परिसराला लागून असलेल्या मौलाना आझाद महापालिका शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका वाचनालयातील विद्यार्थी तसेच भद्रकाली पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी यांनाही अस्वच्छता व दुर्गंधीचा त्रास होत आहे.“काम रद्द करणे हा समस्येवरचा उपाय नाही; समस्या दूर करण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. सर्वधर्मीय व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न राजकारणासाठी वापरू नये. स्थानिक नगरसेवकांना डावलून निर्णय घेणे योग्य नाही,” असे सुफी जीन यांनी स्पष्ट केले. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर जुन्या नाशिकचा विकास करण्याची गरज असताना विकासकामे रोखण्याऐवजी स्थानिक नगरसेवक, व्यापारी व नागरिकांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सुफी जीन
नगरसेवक तथा काँग्रेस गटनेते, नाशिक महानगरपालिका, प्रभाग क्र. १४
नाझिया जाकीर अत्तार,
नगरसेविका,महानगरपालिका, प्रभाग क्र. १४
सामिया सुमैर खान
नगरसेविका,महानगरपालिका, प्रभाग क्र. १४
