*दाभोसा ग्लास स्कायवॉकमुळे पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार पालकमंत्री गणेश नाईक*
जव्हार प्रतिनिधी:प्रशांत वांगड जव्हार
दाभोसा हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असून या ग्लास स्कायवॉकमुळे या पर्यटन स्थळाकडे देशातील तसेच विदेशातील पर्यटकांचा ओघ वाढणार असून याद्वारे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध दाभोसा धबधबा पर्यटनस्थळी उभारण्यात आलेल्या आकर्षक ग्लास स्कायवॉकचे लोकार्पण उत्साहात करण्यात आले.
या प्रसंगी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जव्हारच्या प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर उपवनसंरक्षक सैफुन शेख, भारतीय प्रशासन सेवेतील प्रशिक्षणार्थी पी. व्ही अमल , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केनी, सरपंच योगिता माडी यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, आणि नागरिक उपस्थित होते.
पालघर जिल्ह्याचे भौगोलिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्य लक्षात घेता आगामी काळात जिल्ह्याला देशाच्या पर्यटन आणि आर्थिक नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळेल, असे सांगताना पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की, पालघरची मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता यांसह देशातील विविध भागांशी कनेक्टिव्हिटी वेगाने वाढत आहे. विमानतळ, बुलेट ट्रेन आणि विविध महामार्गांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
पालघरला समुद्रकिनारा आणि डोंगराळ, निसर्गसमृद्ध भाग अशी दुहेरी नैसर्गिक देणगी लाभली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक समुद्रकिनारा आणि पर्यटनस्थळ विकसित करण्याचा सरकारचा मानस असून, पर्यटनातून स्थानिकांना रोजगार आणि उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दाभोसासह जव्हारमधील पर्यटनस्थळांचा विकास
दाभोसा येथील ग्लास स्कायवॉक हे केवळ सुरुवात असून जव्हार तालुक्यातील इतर पर्यटनस्थळांवरही आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
स्कायवॉक परिसरात पार्किंग, पर्यटक सुविधा आणि इतर आवश्यक सोयी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
या पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा ग्रामपंचायतीला मिळावा, तसेच पार्किंग व्यवस्थेतूनही स्थानिक संस्थांना आर्थिक लाभ मिळावा, अशी भूमिका पालकमंत्री गणेश नाईक यांनी मांडली. महिला बचतगटांना पर्यटनाशी जोडून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
‘. पर्यटकांना स्थानिक आदिवासी कुटुंबांच्या घरांमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘होम-स्टे’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणाऱ्या मदतीबरोबरच पर्यटक निवासासाठी आवश्यक अतिरिक्त सुविधा उभारण्यासाठी कर्ज किंवा अन्य आर्थिक सहाय्याची व्यवस्था करण्याबाबत प्रशासनाने विचार करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
यामुळे पर्यटनाचा थेट आर्थिक फायदा स्थानिक आदिवासी कुटुंबांना मिळेल आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
दाभोसा स्कायवॉकवर पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. स्कायवॉकची क्षमता, प्रवेशव्यवस्था, सीसीटीव्ही आणि गर्दी नियंत्रण यंत्रणेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना त्यांनी केली.
सीसीटीव्ही यंत्रणा स्थानिक पोलीस यंत्रणेशी जोडण्यासह प्रवेशद्वारावरील नियंत्रण अधिक सक्षम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पर्यटकांना सुरक्षित वातावरणाचा विश्वास वाटला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत अपघात होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.
पर्यटनस्थळांवरील खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता महत्त्वाची असल्याचे सांगून पालकमंत्री गणेश नाईक यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. पर्यटकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले.
समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्ट, स्थानिक पर्यटन व्यवसाय आणि आदिवासी भागातील उद्योजकांना कायद्याच्या चौकटीत आवश्यक परवानग्या व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली. पर्यटन व्यवसायासाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून, आगामी काळात जिल्ह्यात मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा आणि वाहतूक या क्षेत्रांतही वेगाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आपल्यावर पालघर जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून असलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडून पुढील तीन वर्षे चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात अमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या मनात प्रशासनाविषयी विश्वास निर्माण करणे हेच विकासाचे खरे यश असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
