निसाकावर सोमवार दि.१८ रोजी शेतकरी कामगारांची संघर्ष सभा प्रतिनिधी दिनेश गोसावी निफाड
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निफाड सहकारी साखर कारखान्याची उर्वरित जमीन व अन्य मालमत्ता तातडीने विक्री करण्याचे ठरवले असून त्या विरोधात कारखान्याचे शेतकरी, सभासद व कामगारांनी एल्गार पुकारला असून याबाबत विरोध व विचारविनिमय करण्यासाठी सोमवार दिनांक १८ रोजी सकाळी साडेनऊ वाजता कारखाना कार्यस्थळावर शेतकरी व कामगारांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सन २०२२ ला २५ वर्षाच्या भाडेपट्ट्याने चालवायला दिलेला निफाड साखर कारखाना चौथ्या हंगामातही बंद आहे. कारखान्यात झालेल्या अनेक गैरव्यवहारांची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात जोरात सुरू आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला ड्राय पोर्ट साठी जमीन विक्रीद्वारे ७६ कोटी रुपये कर्जात जमा झाले असून सुद्धा बँकेने तातडीने कारखान्याची उर्वरित जमीन व मालमत्ता विक्रीचा घाट घातला आहे. कारखाना भाडेपट्ट्याचा पंचवीस वर्षाचा करार तसाच कार्यरत ठेवून उर्वरित जमीन व मालमत्ता काही विशिष्ट लोकांच्या घशात घालण्याचा डाव यातून स्पष्ट दिसतो. या कटकारस्थानाला प्राणांतिक विरोध करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी या संघर्ष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कारखान्याचा भाडेपट्ट्याचा करार ,
जमीन विक्री व अन्य गैरव्यवहार यातून कारखान्याचे शेतकरी व कामगारांचे मोठे नुकसान झाले असून याविरुद्ध शेतकरी व कामगारांनी मोठा लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.
निसाका बचाव संघर्ष समिती व निफाड साखर कामगार सभा यांच्याद्वारे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून कारखान्याचे शेतकरी, सभासद व कामगारांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
