द्वारका ते वडाला नाका परिसरात पोलिस बंदोबस्तात मनपा कडून अतिक्रमण कार्यवाही प्रतिनिधी वसीम पठाण नासिक नाशिकमधील प्रमुख आणि नेहमीच वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू ठरलेला द्वारका चौक आता लवकरच सुसज्ज ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेसह नवा चेहरा घेऊन समोर येणार आहे. हाजी अली सर्कलच्या धर्तीवर सुरू असलेल्या प्रकल्पाअंतर्गत सध्या सिग्नल बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी आवश्यक जागा मिळावी म्हणून आज, रविवार दि. १५ जून रोजी सकाळपासून महापालिकेच्या पथकाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली.
द्वारका चौक ते वडाळा नाका दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा केलेली अनधिकृत दुकाने, पत्र्याचे शेड्स आणि रचलेले अडथळे हटवण्यात आले. यामुळे या भागातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर आळा बसला असून, सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी आवश्यक जागा मोकळी झाली आहे.
ही मोहीम सकाळी दहा वाजता सुरू झाली. महापालिकेचे सहा अतिक्रमण गाड्या, दोन जेसीपी, तीन ट्रॅक्टर आणि एक डंपर यांच्यासह सर्व यंत्रणा सकाळपासून सक्रिय होती. अकरा वाजता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली.
या मोहिमेत महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले. अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे, पंचवटी विभागाचे मदन हरिश्चंद्र, सातपूरचे राजाराम जाधव, नाशिक रोड व पश्चिम विभागाचे चंदन घुगे आदी अधिकाऱ्यांनी थेट कारवाईवर नजर ठेवली.
कायद्याची अडचण येऊ नये म्हणून परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी शांतता राखत संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले आणि कारवाई सुरळीत पार पडली.
गोल सर्कल हटवण्यात आल्याने आणि अतिक्रमण हटवल्याने आता सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी द्वारका परिसरातील वाहतूक नियंत्रणात राहील, आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
