सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,नाशिक

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते. अनेक सण या महिन्यात येतात. पावसाचे दिवस असल्याने समस्त सृष्टी जणूकाही हिरवाईचा शालु नेसुन नटलेली असते. संपूर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजेतवाने होऊन प्रसन्न झालेले दिसते. अशा या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यासारखे सण मोठ्या उत्साहाने साजरे करतो आणि या श्रावणाची सांगता होते ती पिठोरी अमावस्या म्हणजेच बैलपोळा या सणाने.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. ग्रामीण कृषी संस्कृती हा देशाचा प्राण आहे. महाराष्ट्र ही त्याला अपवाद नाही. कृषी संस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी येतात. आपल्या भारतीय संस्कृतीत निरनिराळ्या भागात अनेक वैविध्यपूर्ण सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यापैकी एक पोळा हा सण साजरा केला जातो. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. यांत्रिकीकरणाचा काळात देखील शेतीसाठी बैलांचे महत्व आजही महत्वाचे आहे. बैल शेतकऱ्यांचा खरा सोबती असतो. वर्षभर तो शेतकऱ्यांसोबत राबत असतो. शेतकर्यांच्या जीवाभावाचा सोबती बैलाचा पोळा हा सण साजरा करण्याची परंपरा ग्रामीण भागात आहे. बैल हे सामर्थ्याचे, शक्तीचे प्रतीक आहे. बैलांनी भारताच्या राष्ट्रीय चिन्हातही स्थान मिळवलं आहे.
“पोळा करी सण गोळा”, हे विधान जेवढे प्रसिद्ध आहे तेवढेच ते सत्यही आहे. सरत्या श्रावणात येणारा पोळ्याचा सण आपल्या सोबत अनेक सण उत्सव घेऊन येतो. पोळा सणालाच “बैलपोळा” म्हणूनही संबोधले जाते. हा सण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्वाचा सण आहे. या दिवशी बैलांचा थाटमाट असतो. आज त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारची कामं करून घेतली जात नाहीत. उलट त्यांना सजवून, पुरणपोळीचे जेवण देऊन त्यांची गावभरात मिरवणूक काढली जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर या सणाचा प्रमुख उद्देश बैलांप्रति कृतज्ञता भाव व्यक्त करणे होय.

वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्णू तुझे गुण मन मोहरुन जाई,
तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने होईल कसा उतराई
पौराणिक कथा :-
पौराणिक कथेनुसार, प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर अवतरले तेव्हापासून कृष्णाचा मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो. याच दिवशी पिठोरी अमावस्या सुद्धा असते. शेतकरी बांधवांसाठी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सकाळपासून आपल्या लाडक्या बैलांना आंघोळ घातली जाते. बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. नाकात नवीन वेसण, माथोटी, शेला गौंडे, गळ्यात घुंगरांची माळ, फुलांचा हार शिंगांना घुंगरांची श्यामी, फुगे आदींनी आकर्षक सजावट केली जाते. या शिवाय घरात मातीचे बैल, गाय वासरु, घोडा यांचे प्रतीक म्हणून पूजन केले जाते.
बैलांची गावाच्या वेशीतून ढोल-ताशाच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. मारुतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून घरी आणले जाते. घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार केल्या जातात. बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. ‘अतिथी देवो भव:’ या उक्तीनुसार घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करतात, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करुन खायला दिली जातो. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना पूजनासाठी व जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते. बैलांवरुन ओवाळणी टाकली जाते. तद्नंतर घरीची मंडळी व गडी माणसांचे जेवण होते. यंदा पावसाच्या आगमनाने पोळ्याचा उत्साह द्विगुणित झाला.
आला आला पोळा, सण हा मराठ मोळा
पुरण पोळीचा नैवेद्य, सर्जा राजाला दावा
एक दिवस मायेचा, वर्ष कष्टात जायाचा
आज आहे खायचा, गोड नैवेद्य द्यायचा
त्यांना नटवा मिरवा, शिंगे नाजूक सजवा
बाकदार पाठीवरती, झूल मखमली सजवा
गळ्यात घंटणी माळा, पायात घुंगरांचा वाळा
आज आहे सण पोळा,सर्जा राजाला ओवाळा
बैलपोळा सण शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असतो. वर्षभर शेतकरी पोळ्याची आतूरतेने वाट पाहतो. यांत्रिकीकरणाच्या आधुनिक काळात नवनवीन शेतीची अवजारे विकसित झाले असले तरी शेतीची काही कामे बैलांशिवाय होत नाहीत. वर्षभर बैलजोडी पोसणे व त्यासाठी गडी माणसे ठेवणे खर्चिक असले तरी परंपरेमुळे व हौसेने बैलजोडी ठेवली जाते. दुष्काळ असला, कितीही महागाई वाढली तरी शेतकरी ऋण काढून सण साजरा करतो. त्यामुळे यंदाही पोळ्याचा उत्साह कायम आहे.जसे दिव्याविना वातीला,आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना शेतीला पर्याय नाही. या बैल पोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822117037 / +919822817037

