राज्यातील लोक कलावंताचे सर्व्हेक्षण करा शासन दरबारी कुठेही नोंद नसलेल्या राज्यातील दुर्लक्षित आणि उपेक्षित लोक कलावंताचे सर्व्हेक्षण व्हावे.
प्रतिनिधी रत्नदीप जाधव नासिक रोड अशी जोरदार मागणी लोककला क्षेत्रातील अभ्यासक आणि तज्ञांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे. सध्या महाराष्ट्रात अंदाजे पंधरा हजार कलावंत आपल्या कलांच्या उपजिविकेवर जगत आहेत. मात्र शासन दरबारी त्याची कुठेच नोंद नाही. तमाशा – लावणी, भारूड दशावतार, किर्तन, खडीगंमत, शाहिरी, झाडीपट्टी, वासुदेव, जागरण गोंधळ, वही गायन, जाखडी नृत्य, दंडार, सर्कस, अशा विविध प्रमुख असणाऱ्या कला क्षेत्रातील काम करणारे कलाकार आज ही विविध योजनेपासून उपेक्षित वंचित आहेत. त्यांच्याकडे शासनाच्या योजना वेळेत पोहचत नाही. म्हणून सांस्कृतिक कार्य विभागाने या लोक कलावंताचे सर्वेक्षण करावे.आणि त्यांना लोक कलावंत म्हणून ओळखपत्र दयावे. अशी जोरदार मागणी सध्या कला क्षेत्रातून होत आहे.
त्यानुसार राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना एका लेखी पत्राच्या माध्यमातून लोककला अकाडमीचे डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सदर मागणी केलेली आहे.यापूर्वी सांस्कृतिक कार्य संचनालयाने लाखो रुपये खर्च करून राज्यातील लोक कलेचे सर्व्हेक्षण केले आहे. परंतु तळागाळापर्यंत हे काम मुळीच समाधानकारक झालेले नाही. आतापर्यंत संपूर्ण राज्यातील सुमारे ८५ लोककला प्रकाराचे सर्व्हेक्षण झाले आहे. अशी माहिती लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड यांनी दिली.
राज्य सरकारने जर लोक कलावंताचे सर्व्हेक्षण केले तर,निश्चितच सांस्कृतिक कार्य विभागाला कलाकारांसाठी नवीन योजना अंमलात आणायला सहज सोपे जाईल.असे त्यांचे परखड मत आहे.
