सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक

राज्यातील दुसर्या क्रमांकाच्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेत पुढील पाच वर्षांचा कारभार कुणाच्या हाती सोपवला जाईल, याचा निकाल येत्या २९ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
सर्वाधिक मतदार असलेल्या निफाड व ‘कसमादे’ भोवती केंद्रीत असलेल्या या निवडणुकीत उमेदवारांचा समतोल साधण्याचा पुरेपुर प्रयत्न पॅनलप्रमुखांनी केला आहे. यात कुणाची सरशी होते आणि कुणाला हार पत्करावी लागते, याविषयी कमालिची उत्सुकता लागून आहे.
मविप्र शिक्षण संस्थेत निफाड तालुक्यातून सर्वाधिक १० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकमेकांच्या नातेवाईकांमध्ये ही लढत रंगणार असल्याने त्यांचा सारासार विचार उमेदवारी देताना केलेला दिसतो.
सरचिटणीसपदासाठी निलिमा पवार व अॅड.नितीन ठाकरे यांच्यात सरळ लढत होईल. अॅड.ठाकरे हे निफाडचे जावई आहेत. तर निलिमा पवार यांचे सासर निफाडमधील ओणे गावचे आहे. सभापतीपदाचे उमेदवार माणिकराव बोरस्ते यांचा बालेकिल्ला सर करण्यासाठी यंदा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर हे रिंगणात उतरले आहेत. या दोघांचेही नातेसंबंध एकमेकांशी निगडीत आहेत. एकाच पदासाठी दोघेही आमने-सामने आल्यामुळे ही लढत अधिक रंगतदार होईल. महिलांमध्ये भागवत (बाबा) बोरस्ते यांची पत्नी शोभा या देखील निफाडमधील तर प्रगती पॅनलच्या सिंधुबाई आढावही याच तालुक्यातील आहेत.
तर अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.सुनील ढिकले हे २०१७ च्या निवडणुकीत सचिन पिंगळेंपाठोपाठ सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी बढती मिळाल्याने त्यांचा ‘कॉन्फिडन्स’ वाढला आहे. तर आत्मविश्वास कधीही कमी न होऊ देणारे सिन्नरचे आमदार अॅड.माणिकराव कोकाटे यांच्यासमोर निवडूण येण्याचे आव्हान असेल. बुलंद तोफ म्हणून ओळख असलेले आमदार कोकाटे यांचे सिन्नर, निफाड व नाशिक शहरात सर्वाधिक नातेसंबंध आहेत. या बळावर त्यांनी उमेदवारीचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. इतकेच नव्हे तर त्यांना स्वत: सह पॅनलच्या विजयाची जबाबदारी पेलायची आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 9822817037 / 9822117037

