अरशद अन्सारी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार

जव्हार तालुक्यातील ग्रामीण भाग झाप गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोंडीचापाडा गावानजीक मोरीवर छोटा पूल असून गेल्या वीस वर्षापासून या पुलाची उंची वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याच आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी तसेच बांधकाम विभागाने प्रयत्न केले नाहीत,त्यामुळे या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.या भागात दरवर्षी जोरदार पाऊस असतो,परंतु त्या दृष्टीने उपाय योजना होणे अपेक्षित असते,परंतु शासन आणि प्रशासन जाणीवपूर्वक या पुलाची उंची वाढवीत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.पावसाळ्यात येथील जवळपासच्या नदी, नाल्यांना पूर येऊन हा पूल पाण्याखाली जातो व धोकादायक बनतो. या भागात आश्रमशाळा, कॉलेज, आरोग्य केंद्र असून अनेक गावे आहेत. गेल्या आठवडा भरापासुन या भागात मुसळधार पाऊस सुरू असुन झाप, कौलाळे, पवारपाडा, फणसपाडा, पोंडीचापाडा अश्या गावांचा संपर्क हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे तुटला आहे. झाप या महसुली गावाकडे जाणारा हा एकमेव रस्ता असल्यामुळे येथील ग्रामीण जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अति आवश्यक सेवा ठप्प होते, आजारी रुग्ण, विद्यार्थी यांना याचा अधिक फटका बसतो. नदी-नाल्याचे पाणी या पुलावरून जोरात वाहत असल्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात अनेक व्यक्ती वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या वीस वर्षापासून ही समस्या उद्भवत असतांना देखील या पुलाची उंची वाढविण्यात आली नाही. तसेच पुलाला संरक्षक कठडे देखील बांधण्यात आले नाहीत. त्यामुळे या पुलावर पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडत आहेत. या दुर्घटना थांबविण्यासाठी पुलाचे नुतनीकरण करुन त्याला कठडे बांधावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दर वर्षीच ही मोरी तीन ते चार फूट पाण्याखाली जात असते, गावकरी या वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून जीव धोक्यात घालून ये- जा करतात, याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037
