सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

नाशिक तालुक्यातील हरसूलजवळच्या खरपडी घाटात गुजरातला जाणाऱ्या आराम बसला शुक्रवारी (ता. २४) अपघात होऊन ७ प्रवासी गंभीर जखमी झाले. तर ३९ प्रवशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. बसमध्ये एकूण ४६ प्रवासी होते. तीव्र उतारावर ब्रेक न लागल्याने बस बाजूच्या शेतात उलटली. अपघातात सापडलेले सर्व प्रवासी गुजरातच्या कच्छ भूज भागातील आहेत.
खासगी प्रवासी कंपनीच्या १५ आराम बस यात्रेसाठी गेलेल्या होत्या. शुक्रवारी दुपारी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन आटोपल्यानंतर हरसूलमार्गे त्या गुजरातला निघाल्या होत्या. मात्र, सायंकाळच्या सुमारास यातील एका बसचे ब्रेक न लागल्याने ती उलटली. यावेळेस बसमध्ये ४६ भाविक प्रवासी होते. चालकासह सर्व जखमी असून, त्यातील ७ गंभीर जखमी असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर ३५ प्रवासी हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच युवा नेते मिथुन राऊत मदतीसाठी धावले. पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र भोये यांच्या वाहनातून काही प्रवाशांना आणले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात आणण्यासाठी येथील स्थानिकांनी आपले वाहन घेऊन मदत केली. यावेळेस युवा नेते मिथुन राऊत, वामन खरपडे, अशोक लांघे, आखलाक शेख, जयराम भुसारे, आंबादास बेंडकोळी, नितीन लाखन, ज्ञानेश्वर गावित, पावन बोरसे, संदीप भोये, दलपतपूर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोरसे यांसह ग्रामस्थ मदतीसाठी धावले. दरम्यान हरसूल ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी कमी असल्याने राऊत यांच्याकडून समजताच खासगी डॉ. सतीश पाटील, डॉ. बाला यांनी धाव घेऊन जखमींवर उपचार केले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

