सागर पाटील/दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील लहवित गावातील माजी सैनिकांचे कुटुंब सांजेगाव येथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडीकोयंडा तोडून कपाटातील २५ तोळे सोने व एक लाख रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लहवित येथील जनता विद्यालयामागे माजी सैनिक सुरेश तुकाराम मुठाळ हे आई, पत्नी व दोन मुलांसह राहात असुन सुरेश मुठाळ हे लष्कारातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सैनिक विभागातील डि ऐ सी विभागात बॅंगलोर येथे कार्यरत आहेत. ते काही दिवसांपूर्वीच सुट्टीवर आले होते. तर सुट्टी संपल्याने ते गुरुवार दि.९ रोजी ड्युटीवर रुजु होण्यासाठी बॅंगलोर येथे रवाना झाले. त्यांची आई, पत्नी व दोन मुले घरीच होते. शनिवार (दि.११) रोजी सायंकाळी सर्व कुटुंब इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथे नातेवाईकांच्या घरी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रविवार (दि.१२) रोजी सकाळी हे कुटुंब घरी आले असता घराचा कडीकोयंडा तुटलेला तर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले, कपाटाचे लाॅक तोडून त्यातील सोन्याची पोत, कर्णफुले, अंगठी इतर सोन्याच्या वस्तू असे एकुण २५ तोळे सोन्याची दागिने व एक लाख रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात देवून तक्रार दाखल केली. सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव, पोलिस कर्मचारी गुन्हे शोध पथकातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल होत श्र्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यांनी एअर फोर्स रस्त्यापर्यंत मार्ग दाखविला असून देवळाली कॅम्प पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

