राजेंद्र कोल्हे/प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , चांदवड

चांदवड शहरातील प्रभाग क्र. ८ मधील जनरल हॉस्टेलच्या बाजुच्या कच्च्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. हा रस्ता कागदोपत्री तयार झालेला आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र हा रस्ता तयार झालेला नाही. नगरपरिषद जनतेची दिशाभूल करत आहे व हा रस्ता चोरीला गेल्यामुळे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

येथे मागील वीस वर्षांपासून रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. येथे राहणाऱ्या रहिवाशांना वाहतूकीसाठी हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनांची व पायी चालणा-या लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

या रस्त्यात जागोजागी खड्डे पडलेले असून या रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. रस्त्यातील दगडं वर निघालेले आहेत. या दगडांवरून दुचाकी वाहने स्लीप होऊन वाहन चालविणारे नागरिक खाली पडतात व किरकोळ जखमी होतात. वाहन चालविणाऱ्यांना व पायी चालणाऱ्यांना या रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवासी या रस्त्याचा त्रास सहन करत आहेत. ‘या रस्त्यावरून कसे चालायचे?’, हा प्रश्न येथील स्थानिकांना पडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतप्तेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
येथील स्थानिकांनी या रस्त्याचे काम करण्यासाठी अनेकदा नगरपरिषदेला तक्रारी अर्ज दिलेले आहेत. परंतु, अजूनही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यावरून असे निदर्शनात येते की, नगरपरिषदेला नागरिकांच्या समस्यांचे काहीही गांभीर्य नसून नगरपरिषदेला नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यात कोणताही रस नाही. नगरपरिषदेच्या निदर्शनात या रस्त्याची बाब असून सुद्धा नगरपरिषद याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. या रस्त्याच्या कामात नगरपरिषद व राजकारण अडथळे निर्माण करत आहेत.
येथील रहिवाशांना जसा हवा तसा नवीन रस्ता बांधून देण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी व चांदवड पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला. यावेळी योगेश विसपुते, विनोद सोनवणे, सुरेश वाघ, अनिता दवंगे, रंजनाबाई शिंदे, शांताबाई देवरे, सुहास निकुंभे, अबुलेस शेख, पंडित धामणे, समाप्ती भोसले, मीराबाई पाटील, कल्पना भालेराव, सुरेश दवंडे, आदित्य दवंगे अंबादास निफाडे सर्व महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

