जोहरान पठाण / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता, चांदवड

जल जीवन मिशन अंतर्गत केंद्रीय पथकाकडून चांदवड तालुक्यातील जोपुळ, हिरापूर, सुतारखेडे या गावांची पाहणी करण्यात आली. या भेटीत गावातील नळ जोडणी पाणीपुरवठा योजना, पाणी गुणवत्ता याबाबत पडताळणी करण्यात आली. दरम्यान चांदवड तालुक्यातील कामांबाबत पथकाने समाधान व्यक्त करत कौतुक केले.

देशातील प्रत्येक कुटुंबाला घरगुती स्तरावर नळाद्वारे नियमित, शुद्ध व 55 लिटर प्रति मानसी पाणी उपलब्ध करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशनची सुरुवात केलेली आहे. तसेच गावातील सर्व शाळा, सार्वजनिक ठिकाण, यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करावयाचा आहे.

त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

जल जीवन मिशन योजनेची अंबलबजावणी कशाप्रकारे करण्यात येत आहे. या बाबत गाव पातळीवर भेटी देऊन अभिप्राय मिळवण्यासाठी राष्ट्रीय पेय जल स्वच्छता कोलकत्ता यांनी तज्ञ सलागारांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय जलजीवन मिशन सल्लागार नवीन पुरी व गझनफर अहमद यांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने कुटुंब स्तरावर केलेली नळ जोडणी, पाणीपुरवठा योजना, पाण्याचे वितरण, पाणी गुणवत्ता, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गावात सुरू असलेली जनजागृती, लोकसहभाग, शाळा व अंगणवाडी मधील नळ जोडणी आदी घटकांची पडताळणी करण्यात आली. या पथकामार्फत एकत्रित करण्यात येणारी माहिती राष्ट्रीय जलजीवन मिशन नवी दिल्ली यांना सादर करण्यात येणार आहे. या पथकासोबत पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा पडोळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील, रवींद्र महाजन, विस्तार अधिकारी सुनील पाटील, तसेच तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822117037 / +919822817037

