नाशिकमध्ये साहित्यकणाचा जागर
मानवी मूल्यांचाकणा ताठ ठेवण्याचे आवाहन डॉ पृथ्वीराज तौर
प्रतिनिधी अनिस पटेल नासिक साहित्यकणा फाऊंडेशन, नाशिकच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलन उत्साहात पार पडले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. आपल्या उद्घाटकीय भाषणात त्यांनी ‘साहित्यकणा’ या शब्दाचा मानवी उत्क्रांती आणि मज्जारज्जूशी संबंध जोडत एक महत्त्वाचे विधान केले.कणा नसलेले लोक संस्कृती बुडवतात आणि अर्ध्या कण्याची माणसे इच्छा असूनही ती वाचवू शकत नाहीत असे सांगत त्यांनी लेखकांना नैतिक राहण्याचे आणि सत्याचा शब्द उच्चारण्याचे आवाहन केले. तसेच, आगामी काळात AI कृत्रिम बुद्धिमत्ते मुळे येणाऱ्या आव्हानांचा उल्लेख करत, नव्या आशयाचे बलस्थान निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्याला स्वागताध्यक्ष डॉ. प्रशांत आंबरे, संजय करंजकर, अविराज तायडे, मंदा नांदूरकर, फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय गोराडे व सचिव विलास पंचभाई आदी उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक सुरेश पाचकवडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून वर्तमानातील विषम समाजजीवनावर बोट ठेवले. “आज गरिबी आणि बेकारी फोफावली आहे. शेती आहे पण ती पिकत नाही आणि नद्या ओसाड झाल्या आहेत,” अशा शब्दांत त्यांनी ग्रामीण व्यथा मांडली. मराठी साहित्याने शेतकरी समस्यांची दखल नगण्य स्वरूपात घेतल्याची खंत व्यक्त करत त्यांनी डॉ. सदानंद देशमुख, इंद्रजित भालेराव यांसारख्या लेखकांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. केवळ हाडांचा कणा असून चालत नाही, तर माणसाला उभे राहण्यासाठी विचारांचा आणि मूल्यांचा कणाही हवा असतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सत्रांची वैशिष्ट्ये
• कवीसंमेलन: नाशिकच्या अलकाताई दराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रात ७० पेक्षा जास्त कवींनी सहभाग घेत कवितांमधून समाजाचे वास्तव मांडले. राज्यस्तरीय या कविसंमेलनात नागपूर, मुंबई, संभाजीनगर, सांगली, सातारा या भागातील कवींनी सहभाग घेतला
• चर्चासत्र: “वाचन संस्कृती आज लोप पावत आहे का? (डिजिटल स्क्रीन व पुस्तके)” या विषयावर मंदा नांदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली वैचारिक मंथन झाले. डॉ हरिदास आखरें व राकेश वानखेडे यांनीही आपापली मते मांडली, राज शेळके यांनी मुलाखतीतून विविध प्रश्नांची उकल केली
• दुपारच्या साहित्यकणाच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
साहित्यकणा वाड्मय पुरस्कार
• कवितासंग्रह पुरस्कार: ‘नभपर्णिका’ डॉ. पल्लवी वरूळेकर बनसोडे
• कथासंग्रह पुरस्कार:चरैवेति मा.सयाजी शिंदे
• कादंबरी पुरस्कार:फक्कड मा.सचिन फक्कड अवघडे
• बालसाहित्य पुरस्कार:झिलप्या’मा.जितेंद्र कुंवर
• गझलसंग्रह पुरस्कार: ‘एक पक्षी’ मा. सतीश गुलाबसिंह मालवे
साहित्यकणा नाशिकभूषण पुरस्कार
• अनंत ज्ञानमहर्षी पुरस्कार: प्रा. डॉ.दिलीप धोंडगे
• ज्ञानभूषण पुरस्कार: मा.गोपाळराव पाटील (नाशिक)
• साहित्य भूषण पुरस्कार: मा.किरण सोनार (नाशिक)
• वृत्तपत्रसेवा भूषण पुरस्कार: मा.कृतिका मराठे-देशपांडे (नाशिक)
• राष्ट्रीय साहित्य सेवा पुरस्कार: गुरय्या रे. स्वामी कलबुरगी (कर्नाटक)
• समाजभूषण पुरस्कार: मा. वसंत शहाणे (बा. पिंपरी, सिन्नर)
• दिव्यांग साहित्य भूषण पुरस्कार: मा. रत्नाकर शेजवळ (नाशिक)
रजनी वाणी काव्य स्पर्धेचे विजेते
निकाल
प्रथम – नितीन गाढवे
द्वितीय -देवेंद्र गावंडे
तृतीय -भूपाल देशमुख
चतुर्थ – सोनाली मेश्राम
उत्तेजनार्थ – आशा गोवर्धन
सुरेश चौरे, सुजाता येवले, राज शेळके, सुरेखा बोऱ्हाडे आदींनी संमेलनाचे संयोजन केले, निकिता पवार यांनी सूत्रसंचालन केले तर आभार जागृती पाठक यांनी मानले.
